महत्त्वाच्या बातम्या

कुत्रा समोर आला तरी हात जोडतो, फडणवीसांच्या मिश्कील वक्तव्याने नागपुरात हास्यकल्लोळ

नागपूर: नागपूर बार असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास राजकीय शैलीत केलेल्या मिश्कील वक्तव्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. निवडणुकीच्या काळात राजकारण्यांना कशाप्रकारची कसरत करावी लागते आणि लोकांशी कसा संपर्क ठेवावा लागतो, हे स्पष्ट करताना त्यांनी “आम्ही निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी त्यालाही नमस्कार करत असतो,” असे उपरोधिक व मजेशीर उद्गार काढले, ज्यावर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला.

       या पदग्रहण सोहळ्यात बार असोसिएशनच्या वतीने शहरासाठी एका नव्या आणि अत्याधुनिक कोर्ट इमारतीची प्रमुख मागणी मांडण्यात आली. या मागणीवर सकारात्मक प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, नागपूर हे राज्याचे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून सध्याच्या जुन्या कोर्टामध्ये जागेची प्रचंड कमतरता भासत असल्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी नवीन कोर्ट इमारतीची मागणी निश्चितपणे पूर्ण केली जाईल, असा ठोस शब्द दिला. यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार पूर्वीची वास्तू यशस्वीपणे उभी राहिल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

       कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचे आणि विकास कामांचे मुक्तकंठाने कौतुक केले. वकिलांच्या मागण्या या नेहमी ‘हनुमानाच्या शेपटासारख्या‘ लांबत जाणारी आणि सतत वाढत राहणाऱ्या असतात, परंतु मुख्यमंत्र्यांकडे त्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत नाहीकारण ते कोणतीही सूचना मिळताच किंवा मागणी होण्यापूर्वीच त्याविषयीचे अचूक नियोजन पूर्ण करत असतात, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेचा दाखला देत त्यांनी फडणवीस यांनी कधीही विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू दिली नसल्याचे सांगितले. तसेच, वकील हा समाजाचा खरा ‘सोशल इंजिनिअर‘ असल्याचे नमूद करत न्यायमूर्तींच्या निवृत्तीच्या वयातील बदलांसारख्या विषयांवरही त्यांनी आपले विचार मांडले.

       न्यायमूर्ती अनिल किल्लोर यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना स्वतः निवडणूक लढवताना आलेल्या अनुभवांचा व किस्शांचा समाचार घेतला. संघटनेचा अध्यक्ष होणे ही मोठी जबाबदारी असून ज्युनियर वकिलांनी नेहमी आपल्या वरिष्ठांचा योग्य सन्मान राखला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. केवळ उत्तम इंग्रजीचे ज्ञान असणे वकिलांसाठी फायद्याचे नाही, तर जी गरजू आणि गरीब जनता वकिलांना महागडी फी देऊ शकत नाही, त्यांना न्याय मिळवून देणे हे वकीली पेशाचे खरे ध्येय असले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. न्यायमूर्ती आणि राजकारणातील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या संवादात्मक सोहळ्यामुळे नागपूरच्या कायदेशीर वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!