कृष्णा नदी पाठोपाठ कुडाळी नदीकाठी देखील कचऱ्याचे साम्राज्य
कृष्णानदीच्या पाठोपाठ जावळी तालुक्यात उगम पावणाऱ्या कुडाळी नदीला देखील मोठ्या प्रमाणात कचऱ्याने घेरले आहे. नदीच्या पात्रातच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. हा प्रश्न निकाली कसा निघणार असा सवाल नागरिकांडून होत आहे.नदी प्रदूषण ही समस्या गंभीर बनली असून याकडे सबंधित पर्यावरण विभागाने गंभीर्याने पाहिले पाहिजे.
कुडाळी नदी काठावर अनेक गावे आहेत यामध्ये करहर, खर्शी-बारामुरे, सलपाने, आखाडे, हुमगाव, बामणोली,सांगवी, कुडाळ, सर्जापूर, तसेच वाई तालुक्यातील कळंबे व उडतरे अशी गावे आहेत. मात्र या नदीला मोठ्या प्रमाणात कचऱ्याने घेरले आहे. वाई तालुक्यात असणाऱ्या उडतरे गावात तर भर नदीपात्रातच कचरा टाकला जात असून आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उडतरे गावाजवळून जाणाऱ्या या कुडाळी नदीपात्रात पुर्ण पात्रच कचऱ्याचे बनले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, कुजलेले अन्न पदार्थ असल्याने नदीपात्रा जवळ दुर्गंधी पसरली आहे. आजूबाजुला मोठ्या प्रमाणात वस्ती असल्याने या ठिकाणी आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. येथील लोकांनी अनेकदा ग्रामपंचायत, आरोग्य विभाग यांच्याकडे याबद्दल तक्रार केली मात्र ही बाबा कोणीही गंभीर्याने घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नदी प्रदूषण समस्येसाठी आता खऱ्या अर्थाने पर्यावरण विभागाने विशेष पाऊल उचलले पाहिजे. नाहीतर नदीकाठच्या असणाऱ्या गावांमध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतेच केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली तेव्हा लवकरच नदीप्रदूषण संबंधी आपण बैठक घेणार असून याकडे गंभीर्याने लक्ष देऊ असे देखील यावेळी सांगितले.
नदीमध्ये कचरा टाकल्याने तिथल्या आसपासच्या लोकांना दुर्गंधीला सामोरे जावं लागत आहे. नदीत कचरा टाकल्यामुळे पाणी दूषित होत असून ते वापरण्या योग्य राहत नाही. नदीकाठी अन्न टाकल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत आहे. नदी प्रदूषणाचामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
