महत्त्वाच्या बातम्या

खंडाळा गांजा प्रकरणाचा ३८ वर्षांचा वनवास; निवृत्त पोलिसांची न्यायासाठी लढाई सुरूच

सातारा: गुन्हेगारी जगतावर बारकाईने नजर ठेवून कायद्याचे राज्य प्रस्थापित करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्ती नंतर निवांत आयुष्य जगण्या ऐवजी आजही न्यायासाठी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. सातारा जिल्ह्यातून समोर आलेला हा प्रकार संतापजनक आणि तितकाच सुन्न करणारा आहे.तब्बल ३८ वर्षांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट १९८८ मध्ये खंडाळा हद्दीत पकडण्यात आलेल्या १३८ किलो गांजाच्या गुन्ह्याचा खटला अद्यापही प्रलंबित आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी जामिनावर सुटल्यानंतर फरार झाला आणि कधीही न्यायालयात हजर झाला नाहीमात्र, ज्या प्रामाणिक पोलिसांनी ही मोठी कारवाई फत्ते केली होती, त्यातील अधिकारी व साक्षीदार आज वयाच्या ७४ ते ७६ व्या वर्षीही साक्ष देण्यासाठी वयाची पर्वा न करता कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत.

         ऑगस्ट १९८८ मध्ये सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने खंडाळा परिसरात एका मोठ्या कारवाईत तब्बल १३८ किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणी केरळमधील पालेघाट येथील मूळ रहिवासी असलेला ए. पी. मोहम्मद अली या मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकत गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन एलसीबी अधिकारी सुभाष शिंदे, साक्षीदार नारायण ठोंबरे आणि इतर पोलीस पथकाने अत्यंत धाडसाने ही कारवाई पूर्ण केली होती. नियमा नुसार गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन प्रकरण न्यायालयात दाखल झालेपरंतु जामिनावर बाहेर आलेला मुख्य आरोपी त्यानंतर कधीही न्यायालयात सुनावणी साठी फिरकला नाही. पाहता पाहता ही तब्बल ३८ वर्षे उलटून गेली, तरीही हा खटला केवळ कागदपत्रां मध्येच अडकून पडला आहे.

      या प्रकरणातील कायदेशीर लढाईची दुसरी बाजू अत्यंत वेदनादायी आहे. ज्या गुन्हेगारी कृत्या विरोधात या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली, त्यांनाच आता न्याय मिळवण्यासाठी किंवा साक्ष देण्यासाठी ३८ वर्षांनंतरही संघर्ष करावा लागत आहे. या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालेले तत्कालीन अधिकारी सुभाष शिंदे यांना आज वयाच्या ७४ व्या वर्षीही पुण्यावरून साताऱ्यातील वाई न्यायालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. या संपूर्ण कारवाईत सहभागी असलेले दोन पोलीस कॉन्स्टेबल काळाच्या पडद्याआड गेले आहेत, तर हयात असलेले इतर साक्षीदार आणि अधिकारी आज ७४ ते ७६ वर्षांच्या वृद्धापकाळातही न्यायालयात उपस्थित राहत आहेत.

       एकीकडे ज्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे, तो मुख्य आरोपी कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकून मोकाट फिरत आहेतर दुसरीकडे आयुष्यभर प्रामाणिकपणे देशसेवा आणि खाकीची शान राखणारे हे पोलीस अधिकारी आजही न्यायालयाच्या दरबारात न्यायाच्या प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र आहे. साताऱ्यातील या ३८ वर्षांच्या ससेहोलपटीने न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय दिरंगाईवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या वृद्ध पोलिसांना अखेर न्याय कधी मिळणार, हा सवाल आता उपस्थित होत आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!