महत्त्वाच्या बातम्या

खंडाळा पोलिसांची मोठी कारवाई; गांजाची अवैध शेती उध्वस्त, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

दहिवडी: सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत खंडाळा तालुक्यातील मुंडाळवाडी परिसरात गांजाची अवैध लागवड उघडकीस आणली. या कारवाईत सुमारे ८० ग्रॅम गांजा, ₹३,६३,३०० किमतीची रोख रक्कम आणि ₹३ लाख किमतीची चारचाकी असा एकूण ₹६.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खंडाळा पोलिसांनी सापळा रचला. संशयिताच्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा तसेच रोख रक्कम आढळून आली. त्यानंतर पुढील तपासात संबंधित ठिकाणी गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी संशयिताविरुद्ध अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक धनंजय गोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जे. जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत खंडाळा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

खंडाळा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यात अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!