खराब रस्ता व अतिक्रमणामुळे आमरण उपोषण
दहिवडी दि.२२: म्हसवड येथील चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी व या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी गुरुवार दि. २७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अजिनाथ केवटे रस्त्याच्या मध्यभागी मंडप उभा करून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग दहिवडी यांना देण्यात आले आहे.
गेले कित्येक वर्षापासून बांधकाम विभागाने या रस्त्याचे डांबरीकरण केलेले नाही. दरवर्षी म्हसवड नगरपालिका या रस्त्यावर मुरूम टाकतात या या मुरमामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात व धुळीचे साम्राज्य पसरते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडून जखमी झालेले आहेत. या रस्त्यावर म्हसवड पोलीस ठाणे देखील आहे. पोलीस ठाण्याच्या समोरच मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अनेक पोलीस देखील यामध्ये घसरून पडले आहेत. पुढेच कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आहे.
दर बुधवारी आठवडा बाजार असल्यामुळे या रस्त्यावर शेतकरी व व्यापारी यांची मोठे गर्दी होते. मात्र या रस्त्यावरील अतिक्रमणे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण करत आहेत. तरी या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटविण्यात यावी. आणि जीवघेणा रस्ता जोपर्यंत डांबरीकरण होत नाही. रस्त्याच्या मध्यभागी आमरण उपोषण सुरूच ठेवणार असे अजित केवटे यांनी बांधकाम विभाग दहिवडी यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
