महत्त्वाच्या बातम्या

गणेशभक्तांसाठी दगडूशेठ ट्रस्टचा आरोग्यसेवेचा आधार; ६ हजारांहून अधिक भाविकांना मोफत उपचार

पुणे: पुण्याच्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी देशभरातून आणि राज्यभरातून लाखो भाविक दररोज गर्दी करत आहेत. या अलोट गर्दीमध्ये अनेकदा श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, रक्तदाब कमी-जास्त होणे किंवा इतर अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन आरोग्य विषयक समस्यांचा सामना भाविकांना करावा लागतो. अशा प्रत्येक गरजू भाविकाच्या मदतीसाठी धावून जात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात अत्यंत कौतुकास्पद आणि मानवी आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणारी आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदा ट्रस्टच्या १३४ व्या वर्षानिमित्त वृंदावनमधील प्रसिद्ध प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची कोणतीही हेळसांड होऊ नये, म्हणून जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत आतापर्यंत तब्बल ६ हजारहून अधिक भाविकांना दर्जेदार व मोफत वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत.

        गणेशोत्सवाच्या या नऊ दिवसांच्या काळात मंदिर परिसर आणि जय गणेश प्रांगणासह शहराच्या विविध महत्त्वाच्या ठिकाणी सज्ज असणारी ही आरोग्य यंत्रणा २४ तास कार्यरत आहे. या संपूर्ण उपक्रमाचे व्यवस्थापन ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले जात असून, ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यात अहोरात्र योगदान देत आहेत. याविषयी माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, उत्सवकाळात ५५ हून अधिक नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांची आणि डॉक्टरांची समर्पित टीम चोविस तास सेवेसाठी सज्ज आहे. आत्तापर्यंत प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांतून ५ हजार ९०० पेक्षा अधिक भाविकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत, तर गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष आयसीयू (ICU) युनिटमध्ये ९१ पेक्षा अधिक भाविकांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

         भाविकांच्या सोयीसाठी शहरात तीन प्रमुख ठिकाणी सुसज्ज आणि २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत, ज्यामध्ये सिटी पोस्ट परिसर, दगडूशेठ गणपती मंदिर परिसर आणि मांगल्य मंगल कार्यालयजवळ असणाऱ्या केंद्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, केवळ प्राथमिक उपचारच नव्हे, तर गंभीर रुग्णांसाठी महाराष्ट्र राज्य उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या सहकार्याने गणपती मंदिराजवळ १० बेडची अत्यंत आधुनिक व्हेंटिलेटर आणि आयसीयू सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, पुण्यातील नामवंत रुग्णालयांनी या मोहिमेत मोलाचे सहकार्य केले असून, भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर धनकवडी, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, जहांगिर हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी, संचेती हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटल (शंकरशेठ रस्ता, स्वारगेट) येथेही भाविकांना मोफत वैद्यकीय सेवा मिळण्याची सोय करण्यात आली आहे.

          उत्सवकाळात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णांच्या दळणवळणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकाच्या ५ रुग्णवाहिका आणि ट्रस्टच्या स्वतःच्या ४ अशा एकूण ९ अत्याधुनिक रुग्णवाहिका पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पूर्णपणे विनामूल्य सेवेत कार्यरत आहेत. वैद्यकीय मदत केंद्रांवर तसेच प्रत्येक रुग्णवाहिकेत आवश्यक ती सर्व मोफत औषधोपचार सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. आध्यात्मिक भक्ती आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा उत्तम संगम साधत दगडूशेठ ट्रस्टने राबविलेला हा आरोग्यसेवेचा उपक्रम पुणेकरांसह राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी मोठा दिलासा ठरला असून, या संकटमोचक व मानव कल्याणकारी भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!