महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवापूर्वी स्वच्छतागृहे सुरू करा; स्थायी समितीचे निर्देश

पुणे: शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि स्वच्छतेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, महापालिका हद्दीत बंदिस्त किंवा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेली सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहे तातडीने दुरुस्त करून आगामी गणेशोत्सवा पूर्वी नागरिकांसाठी खुली करावीत, असे स्पष्ट निर्देश पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. तसेच, या स्वच्छतागृहांची नियमित आणि उच्च दर्जाची देखभाल-दुरुस्ती सुनिश्चित करण्यासाठी किमान दोन वर्षांचा सर्वसमावेशक देखभाल-दुरुस्ती प्रस्ताव लवकरात लवकर तयार करण्यात यावा, अशा सक्त सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

         शहरात पुणे महापालिकेकडून ‘स्मार्ट टॉयलेट‘ आणि महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहे उभारण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, या नवीन नियोजना दरम्यान शहरात आधीपासून अस्तित्वात असलेली अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे बंद अवस्थेत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण मिळून सुमारे सात हजार इतके टॉयलेट सीट्स उपलब्ध आहेत. परंतु, अनेक ठिकाणी पाण्याचा अपुरा पुरवठा, वीज खंडित होणे, खराब दरवाजे, नळांची गळती तसेच इतर तांत्रिक बिघाड वेळेत न सुधारल्यामुळे ही महत्त्वाची स्वच्छतागृहे वापराविना बंद राहत आहेत, ज्यामुळे नागरिक आणि विशेषतः महिला वर्गाची मोठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची गांभीर्याने दखल घेत स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

      आगामी काळात गणेशोत्सव तसेच विविध सण-उत्सव जवळ येत असल्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते, वर्दळीच्या बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची व भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी आपापल्या हद्दीतील बंद पडलेल्या स्वच्छतागृहांची सविस्तर यादी तयार करावी आणि आवश्यक ती दुरुस्तीची सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या सर्व स्वच्छतागृहांमध्ये नियमित स्वच्छता राखली जाईल आणि पाणी व वीजपुरवठा अखंडित राहील, याची प्रभावी व्यवस्था करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. शहराची स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य सर्वोच्च प्राधान्याचे असून, भविष्यातही स्वच्छतागृहे बंद राहू नयेत यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!