महत्त्वाच्या बातम्या

गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा रूट मार्च; परिमंडळ-३ मध्ये १२० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

पुणे : गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी परिमंडळ-३ अंतर्गत कोथरूड, अलंकार आणि वारजे पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी रूट मार्च काढला.

      पोलिस उपायुक्त सागर कवडे यांच्या अधिपत्याखाली हा रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये परिमंडळ-३ अंतर्गत २ सहाय्यक पोलिस आयुक्त, ९ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, २२ सपोनि/पोउपनि, १२० पोलिस अंमलदार तसेच राज्य राखीव पोलिस दलाची गट-२ मधील १ कंपनी सहभागी झाली. गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेची सज्जता आणि सतर्कता नागरिकांना दिसावी, तसेच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अनुचित प्रकार घडू नयेत, या उद्देशाने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष देण्यासह नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

        रूट मार्च दरम्यान कोथरूड, अलंकार आणि वारजे पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख चौक, सार्वजनिक ठिकाणे, गणेश मंडळे आणि गर्दीची ठिकाणे यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. गणेशोत्सव काळातील वाढती गर्दी, गणेश मंडळांचे कार्यक्रम, विसर्जन मिरवणुका आणि वाहतुकीची वाढती वर्दळ लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

असा आहे रूट मार्चचा मार्ग

कोथरूड पोलिस ठाणे → मुठेश्वर चौक → संगम चौक → भालेकरनगर चौक → छत्रपती शिवाजी महाराज स्मारक → उजवीकडे कोथरूड स्टँडच्या मागील बाजूने सिग्नल → कोकण एक्स्प्रेस चौक → गोसावी वस्ती → फेमल रोड → विकास चौक → कर्वेनगर ब्रिज → डी. मार्ट → डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक.

         गणेशोत्सव विसर्जन शांततामय आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी परिमंडळ-३ अंतर्गत पोलिस अधिकारी व अंमलदार सतर्क असून पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त सागर कवडे यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!