महत्त्वाच्या बातम्या

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेवर संजय राऊतांचे मोठे विधान

मुंबई: आगामी नवरात्रोत्सवाला अजून जवळपास एक महिना बाकी असतानाच, महाराष्ट्रात गरबा आणि दांडियाच्या आयोजनावरून राजकारण तापू लागले आहे. सण-उत्सावांच्या माध्यमातून समाजात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकां कडून केला जात आहे. यातच मंत्री नितेश राणे यांनी गरब्यामध्ये ‘लव्ह जिहाद’ रोखण्याच्या नावाखाली मुस्लिमांना थेट प्रवेशच देऊ नये, अशी आक्रमक भूमिका मांडली होती. या भूमिकेच्या अगदी विरोधात जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उत्सव सर्वांना सामावून घेणारे असतात, असे स्पष्ट करत या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. आता या संपूर्ण वादात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली असून, त्यांनी थेट अमृता फडणवीस यांच्या भूमिकेचे समर्थन करत राज्य सरकार मधील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

       राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सवातील वादानंतर आता नवरात्रीतील गरब्यावरून राजकीय वातावरण पेटले आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यास तीव्र विरोध दर्शवत, जर कोणाला प्रवेश हवा असेल तर धर्मांतराची अट घालावी, अशी वादग्रस्त मागणी केली होती. या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच, अमृता फडणवीस यांनी एका मुलाखतीत किंवा निवेदनात आपली स्पष्ट मते मांडली. “आपला उत्सव सर्वांना सामावून घेतो. एखादा मुस्लिम व्यक्ती जर गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल, तर त्यात गैर काय आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या सर्वसमावेशक भूमिकेचे राजकीय वर्तुळात विविध माध्यमांतून स्वागत करण्यात आले.

        अमृता फडणवीस यांच्या याच भूमिकेवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना थेट त्यांचे समर्थन केले आहे. ”मी अमृता वहिनींसोबत आहे, त्यांची भूमिका अगदी योग्य आहे,” असे स्पष्ट शब्दात राऊत यांनी म्हटले. तसेच, याच मुद्यावरून सरकारला घरचा अहेर देत, ”तुम्ही तुमच्याच मंत्रिमंडळातील लाडक्या बोगस हिंदुत्ववाद्यांचे काऊन्सिलिंग करा,” असा टोलाही त्यांनी अमृता फडणवीस यांना लगावला. जे या राज्याचे यजमान आहेत, त्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बसलेले काही नवहिंदुत्ववादी नेते समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा महाराष्ट्र आणि हा देश उभा करण्यामध्ये व घडवण्यामध्ये सर्व जाती आणि धर्माच्या लोकांचे अतिशय मोठे योगदान आहे, याची जावणूक या नेत्यांना करून देणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी नमूद केले. नवरात्रीच्या तोंडावर गरब्यात प्रवेशाच्या मुद्यावरून पेटलेला हा वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!