महत्त्वाच्या बातम्या

गॅस सिलिंडर मिळण्याचा कालावधी घटला; २५ दिवसांनी करता येणार बुकिंग

नवी दिल्ली: घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर रिफील बुकिंग करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी केंद्र शासनाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला असून, देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागासाठी दोन सिलिंडर मधील बुकिंगचे अंतर आता एकसमान म्हणजेच २५ दिवसांचे करण्यात आले आहे. यापूर्वी मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेता ग्रामीण भागासाठी हा कालावधी वाढवून ४५ दिवस करण्यात आला होता, मात्र आता पुरवठा सुरळीत झाल्यामुळे तो जुना नियम अधिकृतपणे रद्द करण्यात आला असून सर्वच ग्राहकांसाठी दिलासादायक सुधारणा लागू करण्यात आली आहे.

       मध्य पूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये एलपीजीचा संभाव्य तुटवडा आणि वाढती मागणी रोखण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने तातडीने पावले उचलत १२ मार्च २०२६ रोजी नियमात बदल केले होते. या बदलांतर्गत शहरी भागातील ग्राहकांसाठी दोन सिलिंडर मधील बुकिंगचे अंतर २५ दिवस कायम ठेवण्यात आले होते, परंतु ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा कालावधी वाढवून ४५ दिवसांवर नेण्यात आला होता. या वाढीव कालावधीमुळे राज्यासह देशातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा सिलिंडर मुदतीपूर्वी संपल्यास ग्रामीण भागातील गृहिणींना नाइलाजाने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येत होती, ज्यामुळे निर्माण झालेली ही गैरसोय आता संपुष्टात आली आहे.

       सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आणि विनाअथळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाने इंटर-रिफील बुकिंग गॅप कमी करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या आदेशा नुसार आता ग्रामीण असो किंवा शहरी, देशातील सर्वच घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी २५ दिवसांचा एकसमान बुकिंग नियम लागू करण्यात आला आहे. सुधारित नियमांनुसार कोणताही ग्राहक आता पहिला सिलिंडर बुक केल्यानंतर किमान २५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर आपला पुढील सिलिंडर सहजपणे बुक करू शकणार आहे. या नव्या आणि सुटसुटीत धोरणामुळे ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून सिलिंडरच्या अभावी निर्माण होणाऱ्या अडचणी कायमच्या दूर होण्यास मदत होणार आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!