घर खाली करण्यास विरोध महागात पडला; मांजरी खुर्दमध्ये तरुण व वडिलांवर प्राणघातक हल्ला
पुणे: पुणे शहराच्या उपनगरात जमिनीच्या जुन्या वादातून उफाळलेल्या हिंसेची एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. वडिलोपार्जित राहते घर दुसऱ्याच्या जागेत असल्याचा दावा करत घर खाली करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या आणि त्यास विरोध करणाऱ्या एका तरुणावर व त्याच्या वडिलांवर विटा-दगडफेक करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. केवळ मारहाण करून न थांबता आरोपींनी थेट जेसीबी (JCB) मशीन आणून घर पाडण्याचा प्रयत्न केला आणि परिसरात दहशत निर्माण करत उभ्या असलेल्या स्विफ्ट कार, क्रेटा गाडी व पाण्याचा टँकर अशा तीनही वाहनांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात मुख्य आरोपींसह सात जणांवर आणि त्यांच्या अन्य साथीदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, मयुर विठ्ठल पवार (वय ३०, रा. पवार वस्ती, मांजरी खुर्द, पुणे) यांनी या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. फिर्यादी मयुर पवार यांच्या वडिलांच्या मालकीची मांजरी खुर्द येथील गट नंबर ६२८ मध्ये ५ गुंठे जागा असून, तिथे त्यांचे वडिलोपार्जित घर आहे आणि ते कुटुंबीयांसह तिथेच वास्तव्य करतात. दुसरीकडे, आरोपी संदेश सिताराम पवार, कुणाल सिताराम पवार आणि शिवाजी किसन पवार यांची लगतच्या गट नंबर ६२९ मध्ये २० गुंठे मिळकत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या जागेची खाजगी मोजणी करून घेतली होती, तेव्हा मयुर पवार यांचे अर्ध घर त्यांच्या जागेत येत असल्याचा दावा आरोपींनी केला होता. यावर मयुर पवार यांनी सरकारी मोजणीसाठी अधिकृत अर्ज केला होता आणि मोजणीत जी जागा अधिकृत येईल ती देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, असे असतानाही २० सप्टेंबर रोजी दुपारी आरोपी संदेश पवार याने फोन करून मयुर यांना मोजणी कधी येणार अशी विचारणा केली आणि आजच घर पाडून घेण्याची उघड धमकी दिली होती.
त्यानंतर त्याच दिवशी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा वाद हिंसक वळणावर गेला. आरोपी संदेश पवार, कुणाल पवार, शिवाजी पवार, सोमनाथ सुंदरभाऊ पवार, दीपक हरिलाल पवार, राहुल हरिलाल पवार हे सर्वजण आपल्या ४ ते ५ साथीदारांसह कार आणि दुचाकीवरून घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, ते सोबत जेसीबी देखील घेऊन आले होते. त्यांनी मयुर पवार यांना गाड्या बाजूला करून घर पाडत असल्याचे सांगितले. मयुर यांनी ‘याबाबत जे काही असेल ते सकाळी कायदेशीररीत्या बघू‘ असे म्हटल्यानंतर संतापलेल्या मुख्य आरोपीने त्यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या पाठोपाठ इतर आरोपींनी मिळून मोठ्या प्रमाणावर शिवीगाळ करत तुफान दगडफेक सुरू केली. या अचानक झालेल्या हल्ल्यात मयुर पवार यांच्या हातावर व बरगडीवर गंभीर दुखापत झाली. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेले त्यांचे वडील विठ्ठल पवार, पत्नी नम्रता पवार तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेले प्रतीक आव्हाळे आणि विशाल आव्हाळे यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली.
एवढ्यावर न थांबता आरोपींनी संतापाच्या भरात परिसरातील मयुर पवार यांच्या मालकीच्या गाड्यांना लक्ष्य केले. त्यांनी स्विफ्ट कार, क्रेटा गाडी आणि पाण्याच्या टँकरवर दगडफेक करत सर्व वाहनांच्या काचा फोडल्या आणि वाहनांचे दरवाजे व भाग लाथाबुक्क्यांनी व हत्यारांनी चेंबून मोठे आर्थिक नुकसान केले. यादरम्यान आरोपी संदेश पवार याने आपल्या साथीदारांना गाडीतील कोयता काढून आणण्यास सांगत जीवे मारण्याची जाहीर धमकी दिली आणि काही वेळातच सर्वजण तेथून पसार झाले. या भीषण घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विठ्ठल घुले पुढील कायदेशीर तपास करत असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
