महत्त्वाच्या बातम्या

चंद्रकांतदादा पाटलांच्या निर्देशा नंतर सीओईपीचा शुल्काबाबत निर्णय

मुंबई: सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार विद्यापीठ प्रशासनाने शुल्क रचनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुधारीत शुल्क रचनेमुळे विविध मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थिनींना शासनाकडून मिळणाऱ्या शिक्षण शुल्क परताव्याचा (फ्रीशिप व स्कॉलरशिप) जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

     शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने जाहीर केलेल्या नव्या शुल्क रचनेबाबत विद्यार्थी व विविध स्तरांतून निवेदने प्राप्त झाली होती. सामान्य आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या या मागण्यांमागील संवेदन शीलता लक्षात घेऊन उच्च व तंत्र  शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तातडीने पावले उचलली. त्यांच्या दालनात अपर सचिव श्री. रेड्डी आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून जाहीर केलेल्या सर्व शुल्क रचनेची फेररचना करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री महोदयांनी दिले.

     विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काच्या परताव्याचा अधिकाधिक लाभ मिळवून देणे हा या फेर रचनेचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार, शुल्क नियामक प्राधिकरणाच्या (FRA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुधारीत रचना तयार करण्याचे मार्गदर्शित करण्यात आले आहे. या नव्या नियमांनुसार, शुल्क रचनेतील ‘इतर शुल्क’ (Other Fee) हे थेट ‘शिक्षण शुल्कात’ (Tuition fees) समाविष्ट करण्याचे निर्देश विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले आहेत.

कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना होणार फायदा

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे प्रामुख्याने इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJ/NT), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) प्रवर्गातील विद्यार्थी आणि सर्व विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळणार आहे. या घटकांना शासनाकडून मिळणाऱ्या शिक्षण शुल्काच्या परताव्याचा लाभ आता अधिक प्रभावीपणे घेता येईल. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा अत्यंत सकारात्मक निर्णय घेतल्या बद्दल सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रशासनाने राज्य शासनाचे आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!