छत्रपती शिवाजी कॉलेजच्या तीन खेळाडूना शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज मधील तीन आंतरराष्ट्रीय विजेत्या खेळाडूना महाराष्ट्र शासनाचा मानाचा “ शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये बी.ए. द्वितीय वर्षात शिकणारा आर्चरी मधील जागतिक विजेता,अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू ओजस देवतळे याला थेट शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याने जर्मनी आणि फ्रांस येथील जागतिक अर्चारी स्पर्धेत भारताला प्रथमच विजेतेपद मिळवून दिले. त्याने मागील वर्षी चीन येथे झालेल्या एशियन गेम्स मध्ये ३ सुवर्णपदके मिळविली आहेत. नुकत्याच अमेरिका येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत त्याने भारतीय संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे.२३-२४ या वर्षी त्याला प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याला थेट पुरस्कार जाहीर झाला आहे.
कु. संस्कृती मोरे ही पॅरा अॅथलिट असून २०२३-२४ मध्ये चीन येथे झालेल्या पॅरा एशियन गेम्स मध्ये तिने बुद्धिबळ मध्ये भारतातर्फे सांघिक कांस्यपदक मिळविले. महाराष्ट्र शासनाने तिची विशेष क्रीडा कार्यकारी अधिकारी वर्ग १ या पदावर नियुक्ती केली असून तिला मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (अंध – बुद्धिबळ ) जाहीर करून सम्मान केला आहे. तिसरा शिवछत्रपती पुरस्कार आंतरराष्ट्रीय खेळाडू पृथ्वीराज पाटील (रग्बी) याला जाहीर झाला असून त्याने अनेक आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून पदके मिळविली आहेत. मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कारांचे वितरण शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी शिव छत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे होणार आहे.
छत्रपती शिवाजी कॉलेजच्या या तीन विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे छ. शिवाजी कॉलेज, रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोविला आहे.
या यशाबद्दल, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा रामशेठ ठाकूर, छ. शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, क. भा. पा. विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, मा. बंडू पवार, गुणवत्ता हमी कक्षचे प्रमुख, उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे, उपप्राचार्य डॉ. सुभाष वाघमारे, उपप्राचार्य डॉ.आर.एस. माने-देशमुख, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. विक्रमसिंह ननावरे,डॉ. धनंजय नलवडे, प्रा. अभिषेक कदम, जिमखाना समितीचे सर्व सदस्य, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
