छ.प्रतापसिंह राजे भोसले यांच्या 232 व्या जयंती निमित्त नागठाणे येथे व्याख्यानमालेचे आयोजन
छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सातारा हे शहर अत्याधुनिक पद्धतीने वसवले. शहरात नवा राजवाडा, जलमंदिर पॅलेस यांसारख्या काही वास्तू बांधल्या. शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा काढली आणि संस्कृत-मराठीबरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन दिले. छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ छापविले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ केला. सती बंदीचा कायदा केला.अशा समाज सुधारणा करणारा काळाच्याही पुढे असणारा प्रजाहितदक्ष राजा म्हणून इतिहासात अजरामर झाला असे उदगार श्री.विजय मांडके ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार यांनी काढले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या 232 व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती प्रतापसिंह महाराज व्याख्यानमालेत ‘समाज सुधारक प्रतापसिंह महाराज व महाराष्ट्रातील समाज परिवर्तन ‘ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ महेश गायकवाड हे होते.
श्री विजय मांडके आपल्या भाषणात पुढे म्हणाले , सवाई माधवरावाने छत्रपतिपदाची प्रतिष्ठा सामान्यतः राखली परंतु दुसरा बाजीरावाने त्यांचा अवमान करण्यास प्रारंभ केला व अखेरीस छत्रपती प्रतापसिंहांना काशी येथे स्थानबद्ध केले व तेथेच त्यांचा मृत्यु झाला. इतिहासात लोकोपयोगी काम करणारा एक सद्गुणी, लोककल्याणकारी राजा म्हणून प्रतापसिंह महाराज यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखे आहे.
या व्याख्यानमालेचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. महेश गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले ,प्रतापसिंह महाराज यांनी स्वतंत्र ग्रंथालय निर्माण केले. त्यांच्या मृत्यूनंतर ते त्यांच्या पत्नीने लोकार्पण केले. प्रतापसिंह महाराजांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. ते दूरदृष्टीचे राजे होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा. संतोष निलाखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शौकत आतार यांनी केले. तर आभार डॉ.राजाराम कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री गणेश साळुंखे, उपाध्यक्ष श्री प्रदीप बर्गे , उद्योजक श्री अक्षय जेधे तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने विद्यापीठ व राज्यस्तरीय स्पर्धात विविध कलाप्रकारात यश संपादन केल्यामुळे उद्योजक श्री अक्षय जेधे यांनी सांस्कृतिक विभागासाठी पंधरा हजार रुपयांची देणगी दिली.
