जिल्हाधिकाऱ्यांची माणमधील “व्हिलेज गो टू स्कूल ” उपक्रमांना भेट
दहिवडी : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माण तालुक्यातील कासारवाडी, मलवडी, आंधळी या विविध शाळांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी महोदयांनी माण तालुक्यामध्ये नव्याने सुरू असलेला व्हिलेज गोज टू स्कूल इंग्रजी विषय उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. कासारवाडी या गावी व्हिलेज गोज टू स्कूल या शैक्षणिक उपक्रमाचे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी कासारवाडी शाळेमधील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी सुसंवाद साधला. तसेच उपक्रमाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य व तयारी पाहून सर्वांना शाबासकीची थाप दिली.
आंधळी व मलवडी शाळेमध्ये सुरू असलेले BALA(Building As a Learning Aid) बाला पेंटिंग व मुलांचे संगणक ज्ञान ,प्रात्यक्षिक ची माहिती घेत बालचमुंचे मनोबल वाढवले. मलवडी शाळेतील मुख्याध्यापक प्रशांत जाधव यांनी स्वतः इंग्रजी मधून या उपक्रमाचे विवेचन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर,तहसीलदार विकास अहिर, सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे,विस्तार अधिकारी नंदकुमार दंडिले, केंद्रप्रमुख महादेव कदम, कासारवाडी सरपंच गंगाराम सस्ते, आंधळी सरपंच दादासाहेब काळे, मलवडीच्या सरपंच दिपाली जगदाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, शिक्षक उपस्थित होते.
