महत्त्वाच्या बातम्या

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा आदेश

मुंबई: मुंबई आणि पुणे या दोन्ही प्रमुख शहरांमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची (SRA) अंमलबजावणी अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश नगरविकास व गृहनिर्माण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत. मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि ‘महाप्रीत‘ यांच्या संयुक्त माध्यमातून या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या महत्त्वाच्या बैठकीस पुणे ‘महाप्रीत‘चे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव चंद्रशेखर तरंगे यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मुंबई आणि पुणे येथील एसआरए प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

योजनांच्या प्रभावी नियोजनासाठी योग्य सल्लागार संस्थांची निश्चिती करून पुढील टप्पा ठरवणे, सुरू असलेल्या पुनर्वसन प्रकल्पांचे पुनर्वेक्षण व सर्वेक्षण, क्षेत्रनिहाय तपशीलांचे सखोल परीक्षण, तसेच क्षेत्र दुरुस्ती आणि दृश्य पडताळणी (Visual Verification) यांसारख्या विविध तांत्रिक व कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची अंमलबजावणी अधिक वेगवान करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा (MHADA) आणि इतर संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी उत्तम समन्वय राखून सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात, अशा सक्त सूचना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या. तसेच, आवश्यक असलेले सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा आणि सर्व विकासकामे निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण होतील याकडे विशेष प्राधान्य द्यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!