महत्त्वाच्या बातम्या

ठाणे ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिक रूप; शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

ठाणे: प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या क्रीडा, आरोग्य आणि परस्पर संवादाला एक नवी व सकारात्मक दिशा देणाऱ्या ठाण्यातील तब्बल १०० वर्षे जुन्या ऐतिहासिक ‘ऑफिसर्स क्लब’चे नुकतेच पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. या नव्या आणि अत्याधुनिक स्वरूपातील क्लबचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अत्यंत उत्साहात संपन्न झाले. एका शतकाचा गौरवशाली वारसा जपत या वास्तूला आधुनिकतेची जोड दिल्यामुळे ठाण्यातील अधिकारी वर्गामध्ये प्रचंड आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

       प्रशासकीय कामकाजाच्या धबडग्यात आणि व्यस्त दिनक्रमातून अधिकाऱ्यांना मानसिक व शारीरिक विरंगुळा मिळावा, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे तसेच अधिकाऱ्यांमधील परस्पर सौहार्द आणि संवाद वाढीस लागावा, या प्रमुख उद्देशाने या ऐतिहासिक वास्तूचा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे. जुन्या वास्तूचे पावित्र्य आणि ऐतिहासिक सौंदर्य कायम राखत यामध्ये अनेक आधुनिक सुविधांची भर घालण्यात आली आहे. या नूतनी करण केलेल्या क्लबमध्ये आता अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस, बिलियर्ड्स टेबल, सुसज्ज व्यायाम शाळा (जिम) आणि उच्च दर्जाचा आकर्षक कॅफेटेरिया अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधांमुळे अधिकाऱ्यांना कामाच्या ताणातून बाहेर पडून तंदुरुस्त राहण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.

        या ऐतिहासिक क्लबचा सर्व अधिकाऱ्यांनी अधिकाधिक सक्रिय वापर करून या परिसरास आरोग्य, क्रीडा आणि संवादाचे एक चैतन्यमय केंद्र बनवावे, असे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा ऑफिसर्स क्लबचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या वेळी केले. शंभर वर्षांचा जुना वारसा जतन करत वास्तूचे नूतनीकरण करणे हे प्रशासकीय दृष्ट्या अतिशय आव्हानात्मक काम होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि क्रीडा विभागाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेले विशेष परिश्रम आणि वेळेत काम पूर्ण करण्याची त्यांची जिद्द यामुळे हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले गेले. याप्रकरणी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हा प्रशासन आणि उपस्थित मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात आले असून, या नव्या वास्तूमुळे प्रशासकीय अधिकारी वर्गाला उत्तम आरोग्या सोबतच एकत्र येण्यासाठी एक दर्जेदार व अत्याधुनिक व्यासपीठ लाभले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!