महत्त्वाच्या बातम्या

तंत्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया होणार पारदर्शक; निवडक महाविद्यालयांत निरीक्षक नियुक्त

पुणे: राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय प्रवेश फेऱ्यांमध्ये (Institutional Level Admissions) होणारे गैरप्रकार आणि मनमानीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) अत्यंत कठोर आणि महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या अंतर्गत राज्यातील निवडक खासगी महाविद्यालयां मध्ये प्रवेश प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे सीसीटीव्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रक्रियेत कोणतीही त्रुटी किंवा नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधित शिक्षण संस्थांवर तातडीने कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा स्पष्ट इशारा सीईटी कक्षाने दिला आहे.

        शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (CAP) सर्व फेऱ्या यशस्वी रीत्या पूर्ण झाल्यानंतर आता संस्था स्तरीय प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, न्याय्य आणि गुणवत्तेच्या आधारावर पार पाडण्यासाठी सीईटी कक्षाने नियमावली जारी केली आहे. संबंधित महाविद्यालयांनी माहिती पुस्तिकेतील नियम १३ नुसारच ही प्रक्रिया राबवणे बंधनकारक असणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या सर्व फेऱ्या संपल्या नंतरच संस्थास्तरीय फेऱ्या आयोजित केल्या जाव्यात आणि सर्व जागांचे वाटप केवळ अर्जदार विद्यार्थ्यांच्या अधिकृत गुणवत्ते नुसारच केले जावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. इच्छुक विद्यार्थी थेट संबंधित महाविद्यालयात किंवा सीईटी सेलच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून संस्थास्तरीय पर्याय अर्ज सादर करू शकतात. महाविद्यालयांनी थेट आलेले अर्ज आणि सीईटी कक्षाकडून प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीचा ताळमेळ घालून प्रवर्गनिहाय अधिकृत गुणवत्ता यादी तयार करणे आणि ती महाविद्यालयाच्या सूचना फलकावर तसेच अधिकृत संकेत स्थळावर प्रदर्शित करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

           प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी निवडक खासगी महाविद्यालयांमध्ये नजीकच्या शासकीय महाविद्यालयां मधील प्राचार्य, संचालक किंवा वरिष्ठ प्राध्यापकांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली जाईल. हे निरीक्षक कागदपत्र पडताळणी, गुणवत्ता यादी निर्मिती, शुल्क भरणा आणि प्रत्यक्ष जागा वाटप या संपूर्ण प्रक्रियेवर काटेकोरपणे लक्ष ठेवणार असून, दररोज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सक्षम प्राधिकरणाकडे अनुपालन अहवाल सादर करतील. तसेच कागदपत्र पडताळणी आणि जागा वाटप खोली सीसीटीव्हीच्या निगराणी खाली असणे बंधनकारक असून, या सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवावे लागणार आहे. तपासणी, ऑडिट किंवा तक्रार निवारणासाठी सक्षम प्राधिकरणाने मागणी केल्यास हे रेकॉर्डिंग महाविद्यालयाला तत्काळ उपलब्ध करून द्यावे लागेल.

        या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही मध्यस्थ, खाजगी समुपदेशक किंवा सोशल मीडिया वरील दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाच्या राज्यातील ३६ जिल्हानिहाय विद्यार्थी सहाय्यता केंद्राशी किंवा अधिकृत लिंकशी संपर्क साधावा. प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही स्तरावर त्रुटी, अनियमितता किंवा दुर्लक्ष आढळल्यास संबंधित संस्थेवर कोणतीही तडजोड न करता कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा कडक दम सीईटी कक्षाने भरला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!