महत्त्वाच्या बातम्या

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर खड्डे बुजविण्याची धडक मोहीम सुरू

पुणे: औद्योगिक व वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीच्या असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर (रा.म.-५५) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी वरील रस्त्याची पावसाळ्यात झालेली गंभीर दुरवस्था दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिलेल्या सक्त निर्देशानंतर आता रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. हजारो वाहनचालक आणि नागरिकांना रोजचा होणारा त्रास कमी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणेला तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार प्रत्यक्ष कामांना गती देण्यात आली आहे.

        एकूण ५४ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाच्या मार्गापैकी तुलनेने कमी खराब झालेल्या सुमारे ४० किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे अचूक नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, ज्या भागाची अधिक दुरवस्था झाली आहे अशा MIDC पट्ट्यातील सुमारे १४ किलोमीटर अंतरावरील रस्ते सुधारण्यासाठी खड्डे बुजविणे, साईड शोल्डरची दुरुस्ती आणि आवश्यक भरावाची कामे पुढील चार दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, वाढत्या दळणवळणाची गरज लक्षात घेता या मार्गावरील सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

      मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता आणि रस्त्याची तातडीची दुरुस्ती अत्यंत आवश्यक असल्याने, हा मार्ग एका वर्षासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऐवजी (NHAI) राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष लक्ष घालून ५४ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यानुसार बांधकाम विभागाने जानेवारी २०२६ मध्ये कार्यारंभ आदेश देऊन काही भागात कामाची सुरुवात केली होती. मात्र, रस्त्यालगतच्या विविध सेवा वाहिन्यांमुळे (युटिलिटीज) निर्माण झालेले तांत्रिक अडथळे आणि डांबर उपलब्ध होण्यात आलेल्या अडचणींमुळे कामाला हवा तसा वेग मिळाला नव्हता. आता पावसाळ्यात रस्त्याची झालेली सध्यस्थिती लक्षात घेऊन कामाला वेग देण्यात आला आहे.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वतः या संपूर्ण प्रकल्पाचा आणि कामांच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेत आहेत. रस्त्याची सध्यस्थिती तातडीने सुधारण्यासाठी आवश्यक त्या सूचना यंत्रणेला दिल्या जात असून, निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, या मार्गाच्या कायम स्वरूपी दर्जोन्नतीसाठी (Upgradation) महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा मार्फत (MSIDC) मोठे काम हाती घेण्यात येणार असून, आगामी तीन महिन्यांत या कामाची प्रत्यक्ष सुरुवात होण्याचे नियोजन आहे. या स्थायी दर्जोन्नतीमुळे या मार्गाची मालवाहतूक व प्रवासी क्षमता वाढण्यास तसेच भविष्यातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. प्रशासनाच्या या तातडीच्या उपाय योजनांमुळे येत्या काळात हा प्रवास अधिक सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!