तुकाराम मुंढेंच्या कारवाईचे पवारांकडून कौतुक; दूध दरांवर रोखठोक मत
मुंबई: राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरां विरोधात सुरू केलेल्या धडक कारवायांमुळे सध्या सर्वत्र मोठी चर्चा रंगली आहे. मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून अन्नपदार्थ आणि प्रामुख्याने दुधातील भेसळीवर कठोर अंकुश ठेवत कारवाईचा सपाटा लावला आहे. या कडक मोहिमे मुळे दुधाचे दर पूर्वीच्या तुलनेत वाढल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर अत्यंत सकारात्मक भूमिका मांडत मुंढे यांच्या कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे.
एका पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांच्या समोर दुधातील भेसळ रोखण्याच्या कारवाईमुळे दुधाचे दर ६० रुपयांवरून वाढून थेट ८० रुपयांपर्यंत पोहोचल्याचा विषय मांडण्यात आला. त्यावर आपली स्पष्ट प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, दुधातील भेसळ आता थांबली असून त्यामुळे उत्पादकतेला आणि गुणवत्तेला मोठा वाव मिळाला आहे. बाजारात ग्राहकांना शुद्ध आणि चांगलं दूध मिळत असल्यामुळे ग्राहकही त्यासाठी दोन पैसे जास्त मोजण्यास तयार आहेत, यात काहीही गैर नाही, असे सांगत त्यांनी भेसळमुक्तीच्या या कठोर मोहिमेचे मनापासून स्वागत केले.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएने केवळ दुधावरच नव्हे, तर मुंबईसह राज्यभरात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व खाद्य आस्थापनांवरही कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबईतील गोरेगाव येथील ‘ईटक्लब ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि कुर्ला येथील ‘राणी क्रिएटर्स कन्सल्टंट अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स’ यांसारख्या प्रमुख आस्थापनांच्या अन्न परवान्यांवर (Licence) तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एफडीएच्या या धडाकेबाज भूमिकेमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठा थरकाप उडाला असून सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवरचकता बसत आहे.
याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांना मराठा आरक्षणावरून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना बाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी, या प्रश्नावर सरकारकडून तोडगा काढण्यासाठी काही मंत्री प्रत्यक्ष भेटीला जात असल्याचे सांगत परिस्थितीवर लक्ष ठेवल्याचे स्पष्ट केले. एकीकडे सामाजिक आणि राजकीय घडामोडी वेगाने बदलत असताना, दुसरीकडे तुकाराम मुंढे यांच्या एफडीएच्या कारवायांमुळे सामान्यांच्या आरोग्याशी संबंधित अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या कठोर भूमिकेमुळे ग्राहकांना दर्जेदार व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
