महत्त्वाच्या बातम्या

दहिवडीत रंगणार युवा व्हॉलीबॉलचा महासंग्राम; २७ व्या यूथ राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे बिगुल वाजले!

दहिवडी:  माण देशाच्या क्रीडा पंढरीत आता व्हॉलीबॉलचा धडाका पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन संलग्न महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आणि सातारा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली, यंदाच्या ‘२७ व्या यूथ राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे’ यजमानपद दहिवडीच्या सिद्धनाथ स्पोर्ट्स क्लबला बहाल करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत क्रीडा संकुल, दहिवडी येथे पार पडणार आहे.

       ​या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडक संघ सहभागी होणार आहेत. ५ जिल्ह्यांचा मिळून एक विभाग यानुसार राज्यातील विभागांतून मुलांचे ८ आणि मुलींचे ८ संघ असे एकूण १६ संघ जेतेपदासाठी मैदानात उतरतील. २१ वर्षांखालील वयोगटातील ही स्पर्धा असल्याने महाराष्ट्राच्या भविष्यातील ‘स्टार’ खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. दहिवडी येथील सिद्धनाथ स्पोर्ट्स क्लबने आजवर क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाचा मान देण्यात आला आहे. या स्पर्धेमुळे माण तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील ग्रामीण खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे
      ​स्पर्धेसाठी दहिवडी येथील क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने तयार करण्यात येत आहेत. खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन आणि तांत्रिक बाबींकडे आयोजक बारकाईने लक्ष देत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभाला क्रीडा क्षेत्रातील दिग्गज आणि राजकीय मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
​निवड चाचणीवर लक्ष
​या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावरच महाराष्ट्र राज्याचा ‘युथ’ संघ निवडला जाणार आहे, जो पुढे राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करेल. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावून या स्पर्धेत खेळताना दिसेल.

​”दहिवडीसारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय स्पर्धा होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून व्हॉलीबॉल खेळाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक खेळाडूंना प्रेरणा मिळेल.”
— आयोजक, सिद्धनाथ स्पोर्ट्स क्लब, दहिवडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!