महत्त्वाच्या बातम्या

दहिवडीत शिवजयंती उत्साहात; फलटण चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक

 

 

 दहिवडी, दि. २०: दहिवडीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने येथील मध्यवर्ती फलटण चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्यात आले. तसेच भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

    शहराचा विकास होत असताना फलटण चौकाचे महत्त्व वाढत चालले आहे. या चौकातून फलटण, शिंगणापूर, मार्डी, गोंदवले, म्हसवड, मायणी तसेच बसस्थानक व वडूजकडे जाणारे रस्ते जातात. तसेच या ठिकाणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे संपर्क कार्यालय असल्याने चौकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एकमताने या चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे केले.

    शिवजयंतीनिमित्त बाजार पटांगणात मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध गावांतून आलेल्या शिवप्रेमींसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात समीर जाधव यांनी धर्मवीर प्रतिष्ठानतर्फे नाश्त्याची व्यवस्था केली होती.

    सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा ठेवण्यात आला होता. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील कलाकार, ढोल-ताशा पथक, झांज पथक, हलगी, दांडपट्टा, सनई सूर ताफा, घोडे यांचा सहभाग होता. फटाक्यांच्या आतषबाजीत ही शोभायात्रा पार पडली.

    शिवजयंतीनिमित्त दहिवडी शहरात उत्साहाचे वातावरण होते. संपूर्ण शहरात विद्युत रोषणाई व आकर्षक सजावटीने शिवप्रेमींचे लक्ष वेधले.

      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!