दहिवडी काॅलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
दहिवडी : तुमच्या प्रत्येकात क्षमता आहे, वेगळेपण आहे. ती ओळखून तिला न्याय देण्याचा प्रयत्न करा. स्वतःतील क्षमता पुर्णपणे वापरली तर यश नक्की मिळते असे प्रतिपादन दहिवडी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आणि रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज दहिवडीच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी रयतच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, रयतचे सहसचिव (ऑडिटर विभाग) प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नंदकुमार खोत, हणमंत भोसले, मुख्याध्यापिका भारती जाधव, स्नेहल जाधव यांची प्रमुख उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तृत्वाचं मंदिर उभारत असते. तुम्हाला हे मंदिर उभारण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे तुम्ही चांगलं वागलंच पाहिजे. मोबाईलवर वेळ घालविण्यापेक्षा आयुष्य घडवायला वेळ दिला पाहिजे. स्वतःतील गुणवत्ता ओळखून वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विचार अधिक प्रभावी आणि नेमके होण्यासाठी वाचन केले पाहिजे. किंमत दिल्याशिवाय अनुभव मिळत नाही. तुम्ही आकाशाला गवसणी घालावी याच शुभेच्छा.
डाॅ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले, वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा हा महाविद्यालयीन जीवनातील अतिशय आनंददायी प्रसंग असतो. माणदेशात प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या उच्च प्रतिभेच्या अनेक नररत्नांनी यशाचा आलेख सतत उंचावत ठेवला आहे. तसाच आलेख विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाचा सुध्दा उंचावत ठेवावा.
डाॅ. राजेंद्र मोरे म्हणाले, ग्रामीण भागातील अतिशय उत्तम महाविद्यालय म्हणून दहिवडी महाविद्यालयाची ओळख आहे. प्रतिकूल परिस्थितीत उत्कृष्ट प्रतिभा असलेल्या अनेक व्यक्ती या कसदार मातीतून निपजलेल्या आहेत. तुमच्या लौकिकाला, कर्तृत्वाला अधिक झळाळी मिळावी याच शुभेच्छा.
यावेळी स्पर्धा परीक्षा, विविध खेळांच्या स्पर्धा, ट्रेड फेअर, रसायन जत्रा यामध्ये यशस्वी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच आदर्श शिक्षक, सेवक, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय खेत्रे यांनी प्रास्ताविक केले. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मीरा देठे यांनी अहवाल वाचन केले. जिमखाना प्रमुख विक्रम लांडगे व अमीर जाधव यांनी जिमखान्याचा अहवाल वाचला. प्रा. इंद्रजित ऐवळे यांनी सुत्रसंचालन केले तर उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल दडस यांनी आभार मानले.
