दहिवडी जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांचा बालबाजार
दहिवडी : दहिवडी जिल्हा परिषद शाळेत मुलांसाठी बालबाजार उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात लहान मुलांनी भाजीपाला, फळे आणि खाद्यपदार्थांची विक्री केली. या उपक्रमात मुलांनी भाजीपाला, फळे, सरबत, पेप्सी, अंडी, मंचुरियन, भेळ, कैरी, बिस्किटे आणि केरसुणी यांसारख्या विविध वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या.
मुलांना दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहारांची माहिती व्हावी, तसेच खरेदी-विक्री, नफा-तोटा, व्यापार, वजने, ग्रॅम, किलोग्रॅम आणि अपूर्णांक यांसारख्या गणितीय संकल्पनांचा बोध व्हावा, या उद्देशाने या बालबाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी भेट दिली.
गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, विस्तार अधिकारी रमेश गंबरे, नंदकुमार दंडिले, केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड, पूजा देशमाने आणि सनी साठे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दहिवडी नं. १ आणि ३ चे मुख्याध्यापक महादेव महानवर, मुख्याध्यापिका सुनिता यादव, केशर माने, मनिषा बोराटे, रश्मी फासे, रेखा मोहिते, मीनाक्षी दळवी, माया तंतरपाळे, नम्रता चव्हाण आणि तृप्ती दराडे यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
