देवरूख आगाराच्या मद्यधुंद चालकाचा शिवसेना ठाकरे गटाच्या संगमेश्वर तालुका प्रमुखावर हल्ला; चालकाचे निलंबन; चालकावर गुन्हा दाखल
देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील देवरूख आगाराचा अनागोंदी कारभार सुरु असताना आगाराच्या चालक कम वाहकाने शिवसेना ठाकरे गटाच्या संगमेश्वर तालुकाप्रमुखावर हल्ला केल्याची घटना आज गुरूवारी दु. २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या हल्लेखोर चालकाचे त्वरित निलंबन करण्यात आले. तसेच त्याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरूख एस्. टी. आगार आधीच समस्यांच्या गर्तेत असतानाच गुरूवारी चालक तथा वाहक म्हणून कार्यरत असलेल्या संतोष राठोड याने मद्यधुंद अवस्थेत अधिकारी वर्गाशी अरवाच्च भाषेत बर्तन केले. नशेत त्याने शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर यांच्यावर हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. राठोड याचे निलंबन करण्यात आले असून देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेबाबत देवरूख पोलीस ठाण्यात वाहतुक निरीक्षक कैलास साबळे यांनी फिर्याद दिली आहे. देवरूख एस्.टी. आगारात संतोष राठोड चालक तथा वाहक म्हणून कार्यरत आहे. राठोड हा गुरुवारी मद्यधुंद अवस्थेत होता.
ड्युटी लावण्यावरून व अन्य शुल्लक कारणावरून त्याने अधिकारी वर्गाशी हुज्जत घातली. अरवाच्च भाषेत बर्तन केले. राठोड याला समजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांची ऐकण्याची मनस्थिती देखील नव्हती. हा प्रकार दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. याचवेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर साबळे यांच्या दालनामध्ये काही कामानिमत्त गेले होते.
संतोष राठोड याने नशेत बोरूकर यांच्यावर हेल्मटने हल्ला केला. यामध्ये बोरूकर यांच्या कानाला दुखापत झाली आहे. साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष राठोड याच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास देवरूख पोलीस करीत आहेत.
