महत्त्वाच्या बातम्या

दौंड विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त मनुष्यबळाचे प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि. २७: दौंड विधानसभा मतदार संघासाठी नेमण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व अन्य मतदान अधिकाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण राज्य राखीव पोलीस बल गट क्र. पाच, दौंडच्या मंगलमूर्ती खुले सभागृहात चार टप्प्यात घेण्यात आले. यावेळी १ हजार ९१३ अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली.

याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार, प्रशांत काळे, नायब तहसीलदार शरद भोंग, श्रीमती ममता भंडारे आदी उपस्थित होते.

याअंतर्गत श्री. मुल्ला तसेच श्री. शेलार, श्री. काळे आदींनी मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. संत तुकडोजी विद्यालय येथे ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट जोडणी, अभिरूप मतदान (मॉक पोल) कसे घ्यावे, मतदान प्रक्रिया सुरू करताना घ्यावयाची काळजी तसेच मतदान संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) बंद करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. 

मतदान केंद्राध्यक्षांना मतदान प्रक्रिया पार पाडताना करावयाची सर्व कामे, मतदान अधिकारी एक, मतदानाधिकारी दोन मतदान अधिकारी तीन यांनी मतदान केंद्रात करावयाची कामे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मतदानासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदाराने मतदानासाठी आणावयाचे पुरावे याबाबत माहिती दिली. मतदान केंद्र उभारणी तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी घ्यावयाचे साहित्य याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या. मतदानाच्या दिवशी काय करावे, काय करू नये याबाबतच्या सूचना प्रशिक्षणात देण्यात आल्या. निवडणुकीविषयक सर्व अहवाल व्यवस्थितरित्या भरण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणानंतर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची लेखी परीक्षा घेण्यात आली, अशी माहिती श्री. मुल्ला यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!