महत्त्वाच्या बातम्या

ध्वनी मर्यादा उल्लंघन; बिबवेवाडीतील मंडळावर पहिली कारवाई

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तांनी आगामी दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणा बाबत दिलेल्या कठोर इशाऱ्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झाली असून, नियमांचे उल्लंघन करून परवानगीपेक्षा दुप्पट लाऊड स्पीकर लावणारे बिबवेवाडीतील ‘श्रीकृष्ण तरुण मंडळा’वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवात ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेली ही पहिलीच कारवाई ठरली असून, यामुळे शहरातील सार्वजनिक मंडळामध्ये खळबळ उडाली आहे.

         याप्रकरणी श्रीकृष्ण तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल प्रकाश जगताप (रा. बिबवेवाडी ओटा, बिबवेवाडी) यांच्या विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अंमलदार प्रतीक दिलीप करंजे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलीस आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, उत्सवा मध्ये लाऊड स्पीकरसाठी केवळ ‘चार बेस आणि चार टॉप’ इतकीच मर्यादा अनुज्ञेय राहील आणि या नियमाचे उल्लंघन करून अवाजवी आवाज करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करून त्यांची साऊंड सिस्टिम जप्त केली जाईल. मात्र, बिबवेवाडी ओटा येथील या मंडळाने प्रशासनाच्या आदेशाला आणि लेखी नियमांना बगल देत परवानगीपलीकडे जाऊन तब्बल ८ बेस आणि ८ टॉप लाऊडस्पीकर सार्वजनिक ठिकाणी लावले.

         दहीहंडी कार्यक्रमा दरम्यान ठरवून दिलेली मर्यादा ओलांडून मोठ्या प्रमाणावर लाऊडस्पीकरचा कर्णकर्कश दणदणाट केल्यामुळे परिसरातील नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना तीव्र त्रासाचा सामना करावा लागला. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे ध्वनि प्रदूषण करून नियमांचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कायदेशीर बडगा उगारला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गरड करत आहेत. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे आता इतर मंडळांचे धाबे दणाणले असून, नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!