नवी मुंबई मनपात बनावट कागदपत्रांवर नोकरीचा धक्कादायक प्रकार!
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात एका महिलेला बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही महिला दहावी नापास असूनही, ती अनेक वर्षांपासून आरोग्य विभागात ANM (ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ) पदावर कार्यरत होती. एवढेच नाही, तर गर्भवती महिला आणि १६ वर्षाखालील मुलांना औषधे देण्याचे काम ती करत होती, ज्यामुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता.
कसे झाले बनावटगिरीचे प्रकरण?
सदर महिलेने तिच्या लहान बहिणीच्या B.Com व ANM कोर्सच्या प्रमाणपत्रांचा वापर करून स्वतःसाठी नोकरी मिळवली. ती गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. या महिलेच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी असून, तक्रारींच्या आधारावर तिला वारंवार बदली करण्यात येत होती.
प्रशासनाची तपासणी सुरू – दोषी आढळल्यास कारवाई होणार!
या प्रकरणाची माहिती मिळताच, महापालिका प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. या महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचे सिद्ध झाल्यास, तिच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे प्रशासन उपायुक्त शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
६ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण देऊनही प्रश्न कायम!
आरोग्य विभागाकडे या महिलेविरुद्ध वारंवार तक्रारी येत होत्या. पण तरीही तिला ६ महिन्यांसाठी विशेष प्रशिक्षणाला पाठवण्यात आले होते. चौकशीदरम्यान, माहिती अधिकाराखाली तिच्या शैक्षणिक कागदपत्रांची चौकशी करण्यात आली असता, तिच्या लहान बहिणीच्या कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचे उघड झाले.
