महत्त्वाच्या बातम्या

पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यात अव्वल करणार; आशिष शेलारांची मोठी घोषणा

पुणे: पुणे हे केवळ विद्येचे आणि इतिहासाचेच नव्हे, तर समृद्ध संस्कृतीचे आणि वारशाचे माहेरघर मानले जाते. ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला तुफान आणि उत्स्फूर्त प्रतिसाद शहराची सांस्कृतिक ऊर्जा सिद्ध करणारा ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर, आगामी वर्षात हा भव्य सांस्कृतिक महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरा करून ‘पुणे महोत्सव’ म्हणून महाराष्ट्रातील राज्य पातळीवर क्रमांक एकचा महोत्सव बनवला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.

          शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक आणि दीपमाळांनी उजळलेल्या प्रांगणात पार पडलेल्या या विशेष सोहळ्यात मंत्री ॲड. आशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार हेमंत रासने, ज्येष्ठ नेते राजेश पांडे, श्रीपाद अष्टेकर, युवा कलाकार अथर्व सुधामे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगभरात गणेशोत्सवा सारखा व्यापक, सामाजिक प्रबोधन करणारा, परंपरेची जपणूक करणारा आणि लोकसहभागाचा महापूर आणणारा अन्य कोणताही उत्सव पाहायला मिळणे अशक्य असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. गणेशोत्सवाला अधिकृतरीत्या ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्याची मागणी स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेच्या पटलावर हा अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेत गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा बहुमान देण्यात आल्याचे ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले.

       या महोत्सवाच्या माध्यमातून केवळ सांस्कृतिक सादरीकरणच नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जागतिक स्तरावर संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. गणेशोत्सवाच्या घरगुती आणि सार्वजनिक परंपरा, विविध कथा, आठवणी आणि ऐतिहासिक क्षण नागरिकांनी bappa.org या विशेष डिजिटल व्यासपीठावर शेअर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या डिजिटल दस्तऐवजीकरणाच्या माध्यमातून गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जगभरात पोहोचवणे आणि भविष्यात युनेस्कोच्या (UNESCO) अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीसाठी मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व पुरावे गोळा करण्याचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

       यावेळी बोलताना आमदार हेमंत रासने यांनी, गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळवून देण्यासाठी तत्परता दाखविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे पुणेकर नागरिक, सर्व गणेशभक्त व कार्यकर्त्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले. पुण्यात ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात अशा प्रकारचा भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्याबद्दल त्यांनी शासनाचे अभिनंदन केले. श्रीपाद अष्टेकर यांनी bappa.org वेब ॲपच्या माध्यमातून संस्कृती, परंपरा आणि कला एकाच मंचावर आणण्याच्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमा दरम्यान उत्कृष्ट कलाविष्कार सादर करणाऱ्या ‘फोक लोक’च्या कलाकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. पुणेकरांच्या तुफान उपस्थितीने आणि पारंपरिक उत्साहाने हा सांस्कृतिक सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!