पुण्यात औषध वितरकांची १८ कोटींहून अधिक फसवणूक; मुख्य सूत्रधार जयेश जैन जेरबंद
पुणे: पुण्याच्या मध्यवर्ती आणि व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या सदाशिव पेठ परिसरातील औषध बाजारपेठेत खळबळ उडवून देणारी एक मोठी घटना उघडकीस आली आहे. घाऊक औषध वितरका कडून विश्वासाचा गैरफायदा घेत उधारीवर कोटींच्या घरात औषधांचा साठा नेऊन नंतर कोणतीही परतफेड न करता व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार जयेश वसंत जैन याला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अखेर बेड्या ठोकल्या आहेत. जयेश जैन आणि त्याची साथीदार सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी यांच्या विरोधात आतापर्यंत किमान पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, या संपूर्ण रॅकेटच्या माध्यमातून तब्बल १८ कोटी रुपयांपेक्षाही अधिकची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसा कडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, या प्रकरणातील फिर्यादी दिनेश सुभाष कर्नावट (वय ५१, रा. ठुबे पार्क, शिवाजीनगर, पुणे) यांचा सदाशिव पेठेत ‘सिनिअर एजन्सी’ या नावाने औषध विक्रीचा मोठा होलसेल व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानातून संशयित आरोपी सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी (रा. अर्चना कोहिनूर, ग्लोरी सोसायटी, महम्मदवाडी) हिने १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या ऑर्डर्सच्या माध्यमातून तब्बल २३ कोटी रुपयांच्या औषधांची मागणी केली होती. विश्वास संपादन केल्यामुळे फिर्यादीने तिच्या मागण्यांनुसार वेळेत सर्व औषधसाठा पुरवला होता. दरम्यान, सोनालीने दिनेश कर्नावट यांना सांगितले होते की, ती त्यांच्या कडून घेतलेला माल पुढे जयेश वसंत जैन याला सुपूर्द करते आणि जयेश हा हा सर्व औषधसाठा पुढे परदेशात एक्सपोर्ट करण्यासाठी तसेच विविध शासकीय रुग्णालयांना पुरवठा करण्यासाठी नेतो. मात्र, परस्पर विश्वासाचा व व्यापाराचा गैरवापर करत या दोघांनी संगनमताने फिर्यादी कर्नावट यांची तब्बल ३ कोटी ५४ लाख ५५ हजार ३२९ रुपयांची फसवणूक केली.
या प्रकरणात केवळ दिनेश कर्नावटच नव्हे, तर निलेश सोहनलाल सोनिगिरा यांच्यासह इतरही काही नामवंत घाऊक औषध वितरकांना अशाच प्रकारे कोटी रुपयांचा चुना लावण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. एकापाठोपाठ एक अशा विविध गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. आपल्यावर अटकेची तलवार लटकत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्य आरोपी जयेश जैन याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य आणि गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नुकताच फेटाळून लावला. जामीन अर्ज फेटाळला जाताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत वेगाने आणि धडक कारवाई करत जयेश वसंत जैन (वय ४२, रा. भक्तीपुजा अपार्टमेंट, महर्षीनगर, गुलटेकडी) याला अखेर अटक केली आहे. या गंभीर गुन्ह्यातील सहआरोपी सोनाली गिरीगोसावी हिचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून, या मोठ्या औषध फसवणूक रॅकेटचे जाळे कुठे-कुठे पसरले आहे आणि यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा कसून तपास आर्थिक गुन्हे शाखे मार्फत केला जात आहे.
