प्रशिक्षणाव्दारे ज्ञान व कौशल्य वाढवून यशस्वी उद्योजिका व्हा- डाॅ.नितीन पाटील
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बँक पुरस्कृत मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत “शेळी व कुक्कुटपालन सुधारणेसाठी पशुसखींचे कौशल्यवृध्दी प्रशिक्षण” यावर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जि.सातारा येथे १५ दिवसीय “शेळी व परसबागेतील कुक्कुटपालन” हे प्रशिक्षण दिनांक १० ते २४ मार्च दरम्यान आयोजित केले होते. प्रशिक्षणामध्ये दि.२३ रोजी प्रशिक्षण माहिती पुस्तिकेचे अनावरण व प्रशिक्षण साहित्याचे वाटप मा. कुलगुरू,महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या हस्ते मा.सहयोगी अधिष्ठाता डॉ विकास वासकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रशिक्षणाचा लाभ पशुधन विस्तार सेवा कार्यप्रणाली मजबूत व अधिक सक्षम करण्यासाठी करावा तसेच प्रशिक्षणाद्वारे ज्ञान व कौशल्य वाढवून यशस्वी उद्योजिका व्हा असे मत डॉ नितीन पाटील,मा. कुलगुरू महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यामधील पशुसंवर्धनात विशेषतः शेळीपालन आणि परसबागेतील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता त्यांच्या प्रक्षेत्रावर सेवा पुरविण्याच्या दृष्टीने पशुसखींची एक फळी तयार होणार आहे.या पशुसखीद्वारे शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रथमोपचार मार्गदर्शन आणि क्षमता बांधणी याचबरोबर शासनाच्या विविध योजना कार्यान्वित करण्याकरिता या पशुसखींची महत्वाची भूमिका राहणार आहे.या प्रशिक्षणामध्ये उमेद अंतर्गत कार्यरत पश्चिम महाराष्ट्रातील २५ पशुसखी सहभागी झाल्या होत्या. प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थीना शेळीपालन आणि परसबागेतील कुक्कुटपालनातील गोठा व्यवस्थापन,शेळ्यांच्या व कोंबड्यांच्या जाती,खाद्य, आरोग्य व्यवस्थापन, प्रक्षेत्र भेट, प्रथमोपचार,विविध योजना इत्यादी विषयनिगडीत विविध बाबींवर महाविद्यालयीन तज्ञानी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा समारोप दि 23 मार्च रोजी संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आभासी माध्यमाद्वारे मा. संचालक, विस्तार शिक्षण,डॉ ए यू भिकाने,डॉ.निलेश खलाटे, स्मार्ट प्रकल्प समन्वयक पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता डॉ विकास वासकर, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ हे होते. प्रशिक्षणार्थी पशुसखींनी प्रशिक्षणाचा उपयोग उत्तम पशुसेवा करण्यासाठी करावी असे मत मा.संचालक, विस्तार शिक्षण,डॉ ए यू भिकाने, पशुसखींना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता डॉ विकास वासकर यांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात आले.
पशुसखींनी मनोगत व्यक्त करताना उत्तम मार्गदर्शन मिळाले व प्रशिक्षणाचा उपयोग ग्रामीण भागात पशु विस्तार कार्य करण्यासाठी करू अशी ग्वाही दिली.प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ.स्मिता कोल्हे विभाग प्रमुख,पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विस्तार विभाग तसेच स्मार्ट प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण समन्वयक, डॉ.मिलिंद नांदे प्रशिक्षण सह समन्वयक, डॉ.राहुल कोल्हे, डॉ.प्रज्वलिनी मेहेरे, डॉ.तेजस शेंडे, डॉ.नामदेव लटपटे,काळे मॅडम, पदव्युत्तर विद्यार्थी,पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विस्तार विभाग,यांनी प्रयत्न केले.
