महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रमांची जोड; भाजपकडून ‘राजस्व अभियाना’ची घोषणा

मुंबई:

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस ‘सेवा यज्ञ‘ आणि ‘सेवा दिवस‘ म्हणून साजरा करण्याचा संकल्प भाजपने केला आहे. या अंतर्गत राज्यभरात सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवले जाणार असून, १ लाख रक्तदात्यांच्या सहभागासह मोठे महारक्तदान अभियान आयोजित केले जाणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. हे रक्तदान अभियान १९ ते २३ जुलै या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात राबवले जाणार आहे.

शासकीय यंत्रणा आणि पक्ष संघटनेच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत विशेष ‘राजस्व अभियान‘ चालवले जाणार आहे. या अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या जागीच सोडवण्यावर भर दिला जाईल. विशेषतः शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना‘ अधिक प्रभावीपणे राबवून राज्यातील शेत पाणंद रस्त्यांचा कायापालट केला जाणार आहे. याशिवाय ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदवणे, नोंदी दुरुस्त करणे, वारस नोंद करणे आणि ७/१२ चे फेरफार किंवा तुकडे पाडणे यांसारखी महसूल विभागाशी संबंधित कामे या मोहिमेद्वारे जलद गतीने पूर्ण केली जाणार आहेत.

रक्तदान हेच श्रेष्ठदान असून एका व्यक्तीचे रक्तदान दुसऱ्या कोणासाठी तरी जीवनदान ठरू शकते, त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महारक्तदान शिबिरात आणि महसूल अभियानाच्या शिबिरांमध्ये सहभागी होऊन विविध सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. या सामाजिक उपक्रमांमुळे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला एक वेगळे औचित्य प्राप्त झाले असून राज्यभरातील नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!