महत्त्वाच्या बातम्या

फोन उचलला नाही म्हणुन पत्नीच्या गळ्यावर दिला बुटाचा पाय

       पुण्यातील तळेगाव दाभाडे येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात असताना पत्नीने फोन उचलला नाही, या कारणावरुन संशय घेऊन पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करून पतीने बुटाचा पाय पत्नीच्या गळ्यावर ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी पतीला अटक केली आहे. राजश्री संतोष बिसनाळ (वय ३४, रा. म्हाळस्करवाडी, ज्ञानेश अपार्टमेंट, तळेगाव दाभाडे, ता़. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संतोष नागप्पा बिसनाळ (वय ४४, रा़. ज्ञानेश अपार्टमेंट, म्हाळस्करवाडी, तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संतोष बिसनाळ हा एका कंपनीत कामगार आहे. व राजश्री बिसनाळ या मजुरी काम करतात. राजश्री या त्यांच्या घरी असताना संतोषने त्यांना फोन केला होता परंतु राजश्री यांनी फोन उचलला नाही. यावरून त्यांच्यात वाद सुरु झाला व हा वाद एवढा टोकाला गेला की त्याने सायंकाळी घरी आल्यावर पत्नीवर  संशय घेऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.  तसेच पायातील सेफ्टी शुजने मारहाण करुन खाली पाडले. पोटावर व छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुला आज जिवंत सोडणार नाही, असे म्हणत सेफ्टी शुजचा पाय गळ्यावर ठेवून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पतीला अटक केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुल्ला करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!