महत्त्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे ७० विद्यार्थ्यांची फसवणूक; फ्लोरिट डिझायनिंग कॉलेजच्या संचालकांसह दोघांना अटक

पुणे: कलिगा युनिव्हर्सिटीशी संलग्न असल्याचे भासवून आणि फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंगची फ्रँचायझी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार पुणे शहरात उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रे दाखवून डिझायनिंगच्या नामांकित कोर्सेसला प्रवेश देण्याच्या नावाखाली सुमारे ७० विद्यार्थ्यांकडून भरमसाठ पैसे उकळण्यात आले. यामुळे या विद्यार्थ्यांची केवळ आर्थिक फसवणूकच झाली नाही, तर त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी धडक कारवाई करत पुण्यातील संस्थेचा संचालक आणि मुख्य कॉलेजचा संचालक अशा दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

       ​प्रथमेश अशोक राऊत (वय २६, रा. पुनावळे, पुणे) आणि सचिन भिमराव बोराडे (वय ४२, रा. डोंबिवली, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यामध्ये प्रथमेश राऊत हा पुण्यातील संस्थेचा संचालक असून सचिन बोराडे हा ‘फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग’ या मुख्य संस्थेचा संचालक आहे. याप्रकरणी महावीर अशोकचंद दुग्गड (वय ४५, रा. छत्रपती संभाजी नगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली असून, त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

           ​पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिला इंटेरियर डिझायनिंगचे शिक्षण घ्यायचे होते. त्यांनी इंटरनेटवर ‘फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग’ या कॉलेजची माहिती मिळवून संपर्क साधला. त्यानंतर त्यांना पुण्यात बोलावून प्रथमेश राऊत याची भेट घडवून आणण्यात आली. राऊत याने आपण फ्लोरिट कॉलेजचे पुणे येथील स्टडी सेंटरचे हेड असल्याचे सांगत, कलिगा युनिव्हर्सिटीसोबत संस्था संलग्न असल्याबाबतची बनावट कागदपत्रे पालकांना दाखवली. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी १७ जून २०२६ रोजी त्यांच्या मुलीचा प्रवेश निश्चित केला आणि प्रवेशशुल्कापोटी सुरुवातीला १० हजार रुपये भरले.

         ​या कॉलेजचे नियमित वर्ग २१ जुलै २०२६ रोजी सुरू झाले. मात्र, ३ ऑगस्ट रोजी संबंधित विद्यार्थिनीने पालकांना फोन करून सांगितले की, आमचे कॉलेज आता दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये संलग्न केले जात आहे. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पालकांनी संचालकांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर इतर विद्यार्थी व पालकांनी एकत्रित येऊन चौकशी केली असता, फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग आणि पुण्यातील संचालक प्रथमेश राऊत यांच्यात वाद निर्माण झाल्यामुळे मुख्य कॉलेजने पुण्यातील संस्थेची संलग्नता अधिकृतपणे रद्द केल्याचे समोर आले. जेव्हा पालकांनी भरलेली फी आणि मूळ कागदपत्रे तसेच ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) परत मागितले, तेव्हा प्रथमेश राऊत याने स्पष्ट नकार दिला.

        ​फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुमारे ७० पालकांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत दोन्ही संचालकांना ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवला. दरम्यान, मुख्य संचालक सचिन बोराडे यांनी स्पष्ट केले की, पुण्याच्या संस्थेशी वाद झाल्यामुळे या वर्षी प्रवेशासाठी कोणतीही परवानगी दिली नव्हती आणि विद्यार्थ्यांकडून गोळा केलेली कोणतीही रक्कम आमच्यापर्यंत आलेली नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुण्यात सुरू असलेल्या इतर महाविद्यालयात सामावून घेऊ, असे त्यांनी सांगितले. मात्र, पालकांनी विद्यार्थ्यांचे पैसे आणि कागदपत्रे परत करण्याची मागणी लावून धरली असून पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!