बस थांब्याच्या साहित्यावर चोरट्यांचा डोळा…महामार्गालगतची स्थिती; निर्जनस्थळी थांबे उभारल्याने केले लक्ष्य
पुणे-बंगळूर महामार्ग सहापदरीकरण कामानंतर महामार्गावरील प्रत्येक गावच्या बस थांब्यावर प्रवाशांच्या निवाऱ्यासाठी बस थांबे उभारले आहेत. मात्र लाखो रुपये खर्चुन निर्जनस्थळी उभे केलेले बस थांबे चोरट्यांनी लक्ष्य केले आहेत. महामार्गाचे सहापदरीकरण काम सुरू असताना अनेक त्रुटी राहिल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसह येथील स्थानिक नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर प्रत्येक गावच्या फाट्यावर बस थांबे होते. मात्र, ते रस्त्यामध्ये गेल्यानंतर संबंधित कंपनीने प्रत्येक गावच्या ठिकाणी जेथे बस थांबते तेथे हे पॉइंट उभे न करता जिथे वर्दळ नाही आशा निर्जन ठिकाणी थांबे उभे केल्याने प्रवाशांना ऊन, वारा, पावसात उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागते. काही गावच्या फाट्यावर जागा निवडल्या मात्र अगदी लांबपर्यंत देखील हे थांबे नसल्याचे दिसते. आनेवाडी टोल नाक्यापासून साताऱ्याकडे ये जा करताना वर्दळ नसलेल्या ठिकाणी हे थांबे आहेत. त्यामुळे हे किमती साहित्य रात्रीच्या वेळी चोरटे लंपास करू लागले आहेत. अनेक ठिकाणचे हे थांबे आता गायब झालेले दिसत आहेत.
नेमके हे थांबे अशा ठिकाणी का उभे केले? हे न उलगडणारे कोडे आहे. रात्रीच्या वेळी येथे पूर्णतः अंधार असतो. त्यामुळे चोरट्यांना संधी मिळत आहे. जर अशा ठिकाणी हे थांबे उभे केले आहेत, तर त्याठिकाणी विजेची तरी सोय करणे गरजेचे होते.पुणे-बंगळूर महामार्गावर अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे काम केल्याने प्रवासी तसेच आजूबाजूव्या शेतकरी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे.
