महत्त्वाच्या बातम्या

बालवाचकांच्या ‘माझी पहिली गोष्ट’ पुस्तकाचे प्रकाशन

वाई : संयमाचे, विश्वासाचे आणि गरजे पुरताच आधार देणारे वातावरण मुलांना मिळवून देणे हे संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. असे पोषक वातावरण हेच मुलांसाठी खरे प्रोत्साहन आणि प्रशिक्षण ठरते, असे प्रतिपादन सातारा येथील मनोविकारतज्ज्ञ डॉ. अनिमिष चव्हाण यांनी केले.

वाई येथील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव सार्वजनिक मुक्तद्वार ग्रंथालयाच्या सभागृहात बालवाचकांनी लिहिलेल्या ‘माझी पहिली गोष्ट’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला. ‘अ बुक कनेक्शन प्रकाशन संस्था, सातारा’ आणि पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध कवयित्री डॉ. योगिता राजकर म्हणाल्या, “पालकांनी बालकांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन द्यावे. बालवयातच मुलांना व्यक्त होण्याची संधी दिल्यास आजची मुले उद्याचे लेखक आणि कवी बनतील.” मुलांना लहानपणापासून वाचनाची गोडी लागल्यास त्यांची कल्पनाशक्ती विकसित होते, शब्दसंपत्ती वाढते आणि नवनवीन कल्पनांच्या विश्वात रमण्याची संधी मिळते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. अनिमिष चव्हाण यांनी मुलांना स्वतः शिकण्याची आणि चुका करून त्यातून सुधारण्याची संधी देण्याची गरज व्यक्त केली. मुलांना सतत प्रश्न विचारण्याची संधी पालक आणि शिक्षकांनी दिली पाहिजे. “मुलांना जग समजून घ्यायचे असते. त्यांना ते समजून घेऊ द्या आणि व्यक्त होऊ द्या,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. ग्रंथालयाचे सहकार्यवाह प्रा. बाळासाहेब कोकरे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. ज्येष्ठ संचालक डॉ. आनंदराव भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ‘अ बुक कनेक्शन’च्या प्रतिनिधी सौ. स्मिता पोरे यांनी प्रकाशन संस्थेची भूमिका स्पष्ट केली.

ग्रंथालयाच्या कार्यवाह सुनिता कदम यांनी आभार मानताना या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. बालवाचकांमध्ये लेखनकलेचा विकास व्हावा, यासाठी मार्गदर्शनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मे महिन्यात चार दिवसांची कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखनाचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या कथांचे ‘माझी पहिली गोष्ट’ हे पुस्तक ‘अ बुक कनेक्शन, सातारा’ने प्रकाशित केले आहे. या पुस्तकात आठ विद्यार्थी लेखकांच्या कथांचा समावेश आहे.

सहायक ग्रंथपाल सौ. साधना राऊत यांनी सूत्रसंचालन केले. बालकथा लेखिका कु. शुभ्रा तळपाडे आणि पालक प्रतिनिधी श्री. अमोल राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालयाचे संचालक, ग्रंथपाल बाबासाहेब गाडे, सौ. साधना राऊत, सौ. अनिता शेंडे, राहुल गाडे यांच्यासह कर्मचारी आणि सभासदांनी सहकार्य केले. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच यशवंतनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!