महत्त्वाच्या बातम्या

बावधनमध्ये प्रस्तावित खाणपट्ट्या विरोधात ग्रामस्थांचे आमरण उपोषण

वाई :सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन आणि लगतच्या परिसरामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या खडी स्टोन क्रशर व गौण खनिज खाणपट्ट्या विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत वाई तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून या प्रकल्पाला सातत्याने विरोध होत असतानाही प्रशासनाकडून परवानगी व मोजणीची कार्यवाही सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून, जोपर्यंत मागण्यांवर लेखी व समाधानकारक निर्णय होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

         बावधन, म्हातेकरवाडी, अनपटवाडी, वाघजाईवाडी, कणूर आणि दरेवाडी परिसरातील ग्रामस्थांनी बावधन येथील तामखडा शिवारातील गट क्रमांक ३१६६/३ मध्ये हा खाणपट्टा सुरू करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. या खाणपट्ट्या विरोधात यापूर्वी ग्रामसभांचे ठराव मंजूर करण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग आणि पर्यावरण विभागाकडे अनेकदा हरकती व तक्रार अर्ज सादर करण्यात आले आहेत. मात्र, स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता खाणपट्ट्या संबंधित कार्यवाही सुरू ठेवण्यात आल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी (दि. २) थेट तहसील कार्यालया समोर उपोषणाचे हत्यार उपसले.

     हा खाणपट्टा व स्टोन क्रशर सुरू झाल्यास परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ आणि वायुप्रदूषण पसरून शेतीचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच परिसरातील भूजल पातळी खालावणे, पाण्याचे स्रोत दूषित होणे यासह पाझर तलाव, शेतकऱ्यांच्या विहिरी, नागेवाडी कॅनॉल, म्हातेकरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची टाकी आणि संपूर्ण गावठाणाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

      गट क्रमांक ३१६६/३ मधील खाणपट्ट्यास दिलेली परवानगी कायम स्वरूपी रद्द करावी, बावधन पंचक्रोशीत भविष्यात कधीही खाणपट्टा व क्रशरसाठी परवानगी देऊ नये आणि या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्याची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. गणेश रामचंद्र भोसले, निलेश यशवंत भोसले आणि चंद्रकांत आत्माराम सुतार हे उपोषणकर्ते या आंदोलनाचे नेतृत्व करत असून, प्रशासनाकडून ठोस भूमिकेची प्रतीक्षा केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!