बिजवडीतील अतिक्रमण काढले; मुबंई हायकोर्टाचे अतिक्रमण काढण्याचे आदेश
दहिवडी: बिजवडी ता.माण येथील गायरान व गावातील अतिक्रमणे काढण्यात यावी यासाठी ग्रामस्थ एम.के.भोसले व इतरांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.त्या याचिकेवर कोर्टाने अतिक्रमणे काढण्याचे आदेश बिजवडी ग्रामपंचायतीला दिले असून त्याप्रमाणे ग्रामपंचायत च्यावतीने अतिक्रमण काढण्याची मोहिम सुरू केली असून अतिक्रमणांविरोधात ग्रामपंचायतीने हातोडा टाकला आहे.
बिजवडी ता.माण येथील गायरानात काही लोकांनी अतिक्रमणे केली आहेत तसेच गावातही अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत.ती काढण्यात यावीत यासाठी एम.के.भोसले व इतरांनी जिल्हा प्रशासनाला निवेदने दिली होती.त्यानंतर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.त्यावर सुनावणी होऊन गायरान व गावातील अतिक्रमणे काढण्यात यावी असा आदेश ग्रामपंचायतीला आला होता.त्या आदेशानुसार बिजवडी ग्रामपंचायत ने तक्रार केलेल्या अतिक्रमण ठिकाणाची पाहणी करून भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून ती अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली आहे.सुरूवातीला गायरानातील घर,जनावरांचे शेड ही अतिक्रमणे जेसीबीच्या साहय्याने जमीनदोस्त करून काढण्यात आली असून त्यानंतर गावातील अतिक्रमणे काढली जात आहेत.
काही ठिकाणी या अतिक्रमण काढणे मोहिमेला विरोध करण्यात आला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने कोणाचेही न ऐकता कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही केली आहे. या मोहिमेप्रसंगी दहिवडी पोलीस स्टेशन चे सपोनि दत्तात्रय दराडे त्यांचे सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी बिजवडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रा.पं.सदस्य, पोलीस पाटील महेश पवार, सर्व ग्रामसेवक, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुबंई हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने गायरान व गावातील अतिक्रमणे काढण्यात येत असून यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी विनंती श्रीकांत भुंजे, ग्रामसेवक बिजवडी ता.माण यांनी केली आहे.
