महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील मसाजोग गावचे सरपंच हत्या प्रकरणात मोठा खुलासा – मंत्री धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाचा सहभाग उघड

बीड: मसाजोग गावच्या सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला असून, मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या आरोपपत्रातून समोर आले आहे. या प्रकरणात ॲट्रॉसिटी, खंडणी आणि हत्या या तिन्ही घटनांचा समावेश करून एकत्रित आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार हल्लाबोल करत धनंजय मुंडे यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर धनंजय मुंडे यांसारखी मंडळी सत्तेत राहिली, तर अनेक वाल्मीक कराड तयार होतील,” असे तीव्र शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

 सोमवारपर्यंत राजीनामा न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

अंजली दमानिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सोमवारपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेतल्यास आम्ही मोठे आंदोलन उभारू. आम्ही शांत बसणार नाही.” त्यांच्या म्हणण्यानुसार, मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.

 घटनेचा मागोवा – राजकीय दबावाचा संशय

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केला की, “हत्या झाल्यानंतर ६ तारखेला मारामारी झाली आणि त्यानंतर सुदर्शन घुले व वाल्मीक कराड यांच्यात संभाषण झाले. हे सगळे नियोजनबद्ध पद्धतीने घडले आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “बीडमध्ये १०७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, हे केवळ या प्रकरणाशी संबंधित असून यात मोठ्या राजकीय दबावाचा भाग आहे. धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असल्यानेच त्यांना अभय दिले जात आहे.”

 भविष्यातील आंदोलनाचे संकेत

याप्रकरणी अंजली दमानिया आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लवकरच मोठ्या आंदोलनाची तयारी केली असून, “जर लवकरच योग्य कारवाई झाली नाही, तर आम्ही पेटून उठू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

ही घटना बीडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणारी ठरत असून, पुढील काही दिवसांत सरकार आणि प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!