बीड जिल्ह्यातील धारूर येथे होमगार्डवर कोयत्याने हल्ला: संतोष देशमुख हत्येच्या संदर्भात धमकी
बीड जिल्ह्यातील धारूर येथे होमगार्ड अशोक मोहिते यांच्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. काल दुपारी तीनच्या सुमारास, मोहिते आपल्या मोबाईलवर कराड येथील बातम्या पाहत असताना, वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी त्यांना ‘कराड मुंडे साहेबांच्या बातम्या का पाहतो’ असे विचारून दमदाटी केली. तसेच, ‘तुझाही संतोष देशमुख करू’ अशी धमकी दिली.
वाद वाढल्यानंतर, दोघांनी मोहिते यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले आणि तेथून फरार झाले. मोहिते यांना तातडीने लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांनी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचे समजते. या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कृष्णा आंधळेवर अनेक गुन्हे दाखल असून, तो सध्या फरार आहे. कराड तुरुंगात असला तरी, त्याच्या टोळीतील सदस्यांकडून अशा हल्ल्यांच्या घटना घडत आहेत.
बीड जिल्ह्याची बदनामी होत असल्याचा दावा मुंडे कुटुंबीयांनी केला असला तरी, जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.
