महत्त्वाच्या बातम्या

बेकायदेशीर मटका, चक्री खेळ आणि अवैध दारू विक्रीवर तातडीने कारवाई करा – महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची मागणी

बोरगाव : बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील अतीत, सासपडे, अपशिंगे, काशीळ आणि आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध मटका, चक्री खेळ आणि दारू विक्री सुरू असून, त्यामुळे तरुण पिढी बिघडत आहे. या बेकायदेशीर धंद्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कराड उत्तर तालुका अध्यक्ष मा. मंगेश गायकवाड यांनी केली आहे.

    या गावांमध्ये अनेक ठिकाणी मटका आणि जुगाराचे अड्डे चालू आहेत. तसेच, काही ठिकाणी देशी-विदेशी दारूचे खुलेआम विक्री केंद्रे सुरु आहेत. त्यामुळे गावातील तरुणांना वाईट मार्गाला लागण्याची मोठी शक्यता आहे. तसेच, बेकायदेशीर दारूमुळे गावातील अनेक कष्टकरी आणि गोरगरीब लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. या ठिकाणी शाळांच्या परिसरातही मटका आणि दारू विक्री सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

    विशेषतः अपशिंगे गावातील राठोड नावाचा इसम बेकायदेशीरपणे देशी आणि विदेशी पेट्रोल विक्री करत असल्याची तक्रार आहे. अशा लोकांना कोणाचाही धाक राहिलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

    जर पोलीस आणि प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर जिल्हाध्यक्ष किरण दादा बगाडे यांच्या नेतृत्वाखाली, मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते मटक्याच्या चिठ्ठ्यांचे हार घालून आणि देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या गळ्यात अडकवून प्रशासनाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

   संपूर्ण परिसरात हे अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!