भंडारा-गोंदिया शिवशाही बसला अपघात 11 लोक जागीच ठार…29 जण गंभीर जखमी
गोंदिया येथे शिवशाही बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. गोंदिया- कोहमारा महामार्गाजवळ डव्वा येथे आज दुपारी 12.30 सुमारास हा अपघात झाला. या बस मधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 12.30 वाजता भंडाऱ्याहून गोंदियाकडे ही शिवशाही बस येत होती. बस चालकाने दुचाकी स्वाराला ओव्हरटेक करताना डव्वा येथे बस उलटली. सुमारे 20 फुट अंतरावर बस घासत गेल्याने 11 प्रवासी जागीच मृत्यूमुखी पडले. व 29 जण गंभीर स्थितीत आहेत. भंडारा-गोंदिया बस क्रमांक MH09 M1273 या बस मध्ये 40 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गंभीर जखमी झालेल्यांची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
अपघात स्थळी गावकऱ्यांनी धाव घेत मदतकार्य राबवले व बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. घटनास्थळी ऍम्ब्युलन्स पोहचून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मदत कार्यास सुरुवात झाली.दरम्यान अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. अपघातात जखमी झालेल्यांना गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले आहे.
