महत्त्वाच्या बातम्या

भाजपला कल्याणमध्ये धक्का? गणपत गायकवाडांचे निकटवर्तीय अनंता पावशे शिंदेसेनेत

कल्याण: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत कमालीची खळबळ उडाली असून, एकापाठोपाठ एक येणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे वातावरण तापले आहे. महायुती मध्ये स्थानिक स्तरावर युती असली तरी कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्षादरम्यान एकमेकांचे शिलेदार फोडण्याची जणू चढाओढच लागली आहे. रविवारी काही कार्यकर्त्यांनी शिंदेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर अवघ्या चोवीस तासांच्या आत प्रत्युत्तर देत शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. तुरुंगात असलेले भाजपचे आक्रमक आमदार गणपत गायकवाड यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक अनंता पावशे यांनी शेकडो समर्थकांसह अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्या मध्यस्थीने पार पडलेल्या या पक्षप्रवेशामुळे कल्याणच्या स्थानिक राजकारणात मोठा भूकंप झाल्याचे मानले जात आहे.

       कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसेची युती कागदावर असली तरी प्रत्यक्षात तळागाळात मात्र एकमेकांचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक आपल्याकडे ओढण्याचे सत्र वेगाने सुरू आहे. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीमधील अंतर्गत कलह उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. अनंता पावशे यांच्या या पक्षांतराने कल्याण पूर्वेतील भाजपच्या गोटात चिंता वाढवली असून, या राजकीय पळवापळवीमुळे दोन्ही पक्षांमधील स्थानिक पातळीवरील ताणतणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

     एकदीकडे कल्याणमधील या स्थानिक संघर्षाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले असतानाच, दुसरीकडे संपूर्ण राज्यभरात एका मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे. आगामी नवरात्रीपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तब्बल १४ आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा खळबजनक दावा शिंदेसेनेतील एका बड्या नेत्याने केला आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे विधानसभेत २० आमदार आहेत, आणि जर हा दावा खरा ठरला तर ठाकरे गटासाठी हा अत्यंत विनाशात्मक आणि मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. अद्याप या १४ आमदारांची नावे अधिकृतपणे समोर आलेली नसली तरी, या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि खळबळ उडाली आहे. स्थानिक पातळीवरील इनकमिंग-आऊटगोइंग आणि राज्य पातळीवरील या मोठ्या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्रातील आगामी राजकारण अतिशय रंगतदार आणि चुरशीचे ठरणार यात शंका नाही.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!