महत्त्वाच्या बातम्या

भाजपला धक्का; शेखर गोरे शिवसेनेत प्रवेश करणार, माणमध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार

सातारा: राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर वेगाने बदलत असलेल्या राजकीय समीकरणांमध्ये सत्ताधारी महायुती मधून एक मोठी घडामोड समोर आली आहे. यापूर्वी विरोधकांना धक्के देणाऱ्या महायुतीमध्ये आता मित्र पक्षांमध्येच इनकमिंग-आऊटगोइंगचे राजकारण रंगल्याचे दिसून येत आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खालील शिवसेनेने थेट मित्रपक्ष असलेल्या भाजपलाच मोठा राजकीय धक्का दिला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे हे आगामी १ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या घडामोडीमुळे माण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे बळ वाढणार असून, भाजपसाठी हा एक मोठा झटका मानला जात आहे.

       विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राजकीय पक्षांतरांना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा होती. मात्र, आता थेट भाजपच्या नेत्याला आपल्या गळाला लावून शिंदे गटाने विरोधकां सोबतच मित्र पक्षालाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शेखर गोरे यांना उमेदवारी किंवा अन्य महत्त्वाच्या भूमिके बाबत शब्द देण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी हा शब्द पाळला न गेल्यामुळे शेखर गोरे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर तीव्र नाराज होते. अखेर भाजप मधील या अंतर्गत अस्वस्थतेमुळे त्यांनी भाजपची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ सप्टेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असून, या निर्णयामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

         या पक्ष प्रवेशामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना त्यांच्याच होमपिचवर मोठा राजकीय धक्का बसल्याचे चर्चा रंगली आहे. मागील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर अनेक नेत्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता, परंतु आता शेखर गोरे यांच्या माध्यमातून शिवसेनेने भाजपची कोंडी केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेखर गोरे यांच्या या निर्णयामुळे माण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद तळागाळात अधिक मजबूत होणार आहे. आगामी स्थानिक व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या राजकीय बदलाचे दूरगामी परिणाम सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!