महत्त्वाच्या बातम्या

भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; सात नव्या ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ धावणार

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशांतर्गत रेल्वे कनेक्टिव्हिटीला अधिक बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. उत्तर, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतातील प्रमुख शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी तब्बल सात नव्या ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ गाड्या सुरू करण्याची जय्यत तयारी रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना वंदे भारत ट्रेनसारखाच उच्च दर्जाचा आणि आरामदायक प्रवास आता अत्यंत किफायतशीर दरात अनुभवता येणार आहे.

       प्रवाशांची वाढती गैरसोय दूर करण्यासाठी आणि विविध राज्यांमधील दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी सात नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये धनबाद ते कोईम्बतूर, प्रयागराज ते मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस), प्रयागराज ते उधना, सुबेदारगंज ते मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस), गोरखपूर ते दिल्ली, गोरखपूर ते मुंबई (बांद्रा) आणि चार्लापल्ली ते गोरखपूर या प्रमुख मार्गांचा समावेश आहे.

        विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीने या नवीन सेवा अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. सुबेदारगंज ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान साप्ताहिक सेवा प्रस्तावित असून, याद्वारे फतेहपूर, गोविंदपुरी, भरुआ सुमेरपूर, रागौल, बांदा, चित्रकूटधाम यांसह कल्याण आणि ठाणे या प्रमुख शहरांमधील प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच प्रयागराज-मुंबई LTT ही गाडी इटारसी, भुसावळ आणि कल्याण मार्गावरून धावणार आहे. याशिवाय, गोरखपूरहून मुंबई बांद्रापर्यंत धावणारी अमृत भारत एक्स्प्रेस गोडा, कानपूर सेंट्रल, आग्रा फोर्ट, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, पालघर आणि बोरीवली या महत्त्वाच्या स्थानकांना जोडणार असल्यामुळे कोकण आणि मुंबई परिसरातील प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुकर होणार आहे.

            इतर राज्यांच्या संपर्काचा विचार करता, झारखंडमधील धनबादला तामिळनाडूतील कोईम्बतूरशी जोडणारी गाडी गया, प्रयागराज, जबलपूर, नागपूर, विजयवाडा आणि तिरुपतीसारख्या प्रमुख शहरांमधून मार्गक्रमण करेल. प्रयागराजला गुजरातमधील उधनाशी जोडणारी साप्ताहिक गाडी इटावा, आग्रा, कोटा आणि रतलाम मार्गे धावणार आहे. पूर्व उत्तर प्रदेशाला थेट राजधानी दिल्लीशी जोडणारी गोरखपूर-दिल्ली एक्स्प्रेस खलीलाबाद, बस्ती, गोंडा, बरेली आणि मुरादाबादमार्गे धावणार असून, तेलंगणातील चार्लापल्ली ते गोरखपूर ही लांब पल्ल्याची गाडी नागपूर, इटारसी, झाशी आणि लखनौसारख्या महत्त्वाच्या केंद्रांना जोडणार आहे. आधुनिक सुविधांनी युक्त आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या या अमृत भारत एक्स्प्रेसमुळे देशांतर्गत रेल्वे प्रवासाचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!