महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; ७ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

भिवंडी: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. भिवंडीतील नरपोली परिसरातील भंडारी कंपाउंड मधील गंगाराम वाडी भागात एक चार मजली इमारत पत्त्याच्या महलासारखी अचानक कोसळली. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अजूनही काही मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती मोचन दल (NDRF) आणि अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भिवंडीतील ही ‘कोहिनूर अपार्टमेंट’ (बी-विंग) नावाची चार मजली इमारत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक झाली होती. भिवंडी-निझामपूर शहर महानगर पालिकेने (BNCMC) या इमारतीचे वर्गीकरण ‘सी-श्रेणी’ (अतिधोकादायक) अंतर्गत केले होते. प्रशासनाकडून यापूर्वीच या इमारतीला नोटीस बजावण्यात आली होती आणि बहुतांश रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेरही काढण्यात आले होते. मात्र, असे असतानाही या इमारतीच्या तळमजल्यावर अनधिकृतपणे दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री इमारतीमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामा दरम्यान काही मुख्य खांब (Columns) तुटल्यामुळे इमारतीचा पाया पूर्णपणे कमकुवत झाला आणि मध्यरात्रीच्या सुमारास इमारतीचा एक मोठा भाग अचानक कोसळला. रात्रीच्या वेळी हे काम सुरू असल्यामुळे तिथे काही कामगार उपस्थित होते. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतीचा हात पुढे केला.

घटनास्थळी एनडीआरएफचे पथक, ठाणे व भिवंडी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी तातडीने दाखल झाले. एनडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत ढिगाऱ्याखालून एका महिलेला सुखरूप जिवंत बाहेर काढले असून, तिला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली अजूनही ४ ते ५ जण (प्रामुख्याने कामगार) अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. ढिगारा हटाने आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी व इतर अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. या दुर्घटनेमुळे भिवंडी शहरात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामे आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

 

 

 

 

 

 

                                                    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!