महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाची रंगीत तालीम; १५ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई: देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर मंत्रालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आज मंत्रालयात या सोहळ्याची अधिकृत रंगीत तालीम (Dress Rehearsal) अत्यंत उत्साहात आणि शिस्तीत पार पडली. सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागामार्फत या सोहळ्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न होणार आहे.

       आज पार पडलेल्या रंगीत तालीम सोहळ्यात राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव अविनाश सोलवट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर उपस्थित पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. या दिमाखदार रंगीत तालीमेमध्ये मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दल (SRPF) तसेच विशेष घोडेस्वार पथक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. याशिवाय, कलाकार किरण शिंदे, अरुण शिंदे आणि विवेक शिंदे यांनी आपल्या सुमधुर सनई वादनाने वातावरण अधिक देशभक्तीमय केले. या संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान पोलीस दल, मुख्यमंत्री सुरक्षा दल, राजशिष्टाचार विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून सर्व व्यवस्थेची पाहणी केली.

            आगामी १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यासाठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, लोकायुक्त, मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त, महावाणिज्य दूतावासांचे अधिकारी यांच्यासह विविध संवैधानिक संस्था व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तसेच भारतीय सेना, नौदल, वायुदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे (Indian Coast Guard) वरिष्ठ अधिकारी या राष्ट्रीय सोहळ्याला विशेष उपस्थिती लावणार आहेत.

        स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा, संचलन, पार्किंग आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या (VIP) स्वागताची चोख तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आजच्या रंगीत तालीमेद्वारे या सर्व सुरक्षा व व्यवस्थांची कसून खात्री करण्यात आली असून, सोहळा अत्यंत दिमाखात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!