मलवडीच्या ‘राधा’ ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद
दहिवडी: जगातील सर्वात बुटकी जिवंत पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडीच्या ‘राधा’ ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. या ठेंगण्या ठुसक्या ‘राधा’ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून प्रत्येक प्रदर्शनात ती गर्दी खेचत आहे. मलवडीतील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हैशीच्या पोटी १९ जून २०२२ रोजी ‘राधा’चा जन्म झाला. ‘राधा’ दोन-अडीच वर्षाची झाल्यावर तिच्या उंचीतील बदल त्रिंबक बोराटे यांच्या लक्षात आला. त्यानंतर श्री बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने ‘राधा’ला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. २१ डिसेंबर २०२४ सोलापूर येथील सिध्देश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा ‘राधा’ने सहभाग घेतला. अन् ‘राधा’चा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी कृषी प्रदर्शन व कर्नाटकातील निपाणी येथील कृषी प्रदर्शनासह एकूण १३ कृषी प्रदर्शनात खास आकर्षण म्हणून ‘राधा’ला निमंत्रित करण्यात आले.
