महाराष्ट्रातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार
राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, सुकाणू समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ही माहिती विधिमंडळात दिली.
२०२५-२६ पासून अंमलबजावणी सुरू
शालेय शिक्षण विभागाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारी सुरू केली आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम लागू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. सध्या सीबीएसई शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारले जाते, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना अशा शाळांमध्ये शिक्षण घेणे अवघड होते. या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे कमी खर्चात दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार आहे.
मराठीत मिळणार सीबीएसई अभ्यासक्रम
आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत हा विषय उपस्थित केला असता, शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, सीबीएसई अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके मराठीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच १ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे.
किती शाळांमध्ये लागू होणार?
सध्या राज्यातील किती शाळांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे, याची निश्चित माहिती नाही. मात्र, राज्य शिक्षण मंडळ आणि सीबीएसई या दोन्ही पर्यायांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची अधिक संधी उपलब्ध होणार आहे. तसेच कमी शुल्कात उत्तम शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पालक आणि विद्यार्थी या निर्णयाचे स्वागत करत आहेत.
