महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील ३.५ लाख कोटींची गुंतवणूक मोदींनी पळवली  –  सुनील माने

       पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदी आपल्या भाषणातून मोदी राज्यात अनेक उद्योग धंदे आणल्याचे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात मोदींनी ३.५० लाखाहून अधिकची महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातला पळवली, महाराष्ट्राला मात्र त्यांनी फक्त पोकळ आश्वासने दिली. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ते सुनील माने यांनी व्यक्त केले.

     यावेळी ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे लोक सातत्याने राज्यात खोटे नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी आणि एकंदरीतच सर्व भाजपाचे गुजरात प्रेम सर्वश्रुत आहे. महाराष्ट्राविषयी त्यांना मात्र त्यांना सातत्त्याने आकस असल्याचे जाणवते. मोदींनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी पुण्यात घेतलेल्या प्रचारसभेत पुण्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्रातले जवळपास १६ पेक्षा अधिक प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरात आणि दिल्लीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. 
      देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे या मुंबई शहरात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) होणार होते या माध्यमातून १ लाख २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती. मात्र हा प्रकल्प सुरतला नेण्यात आला. यामाध्यमातून जवळपास ५ लाख युवकांना रोजगाराची संधी निर्माण झाली असती. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील तळेगाव मध्ये वेदांता फॉक्सकॉन कंपनी १ लाख ५४ हजार कोटी रुपये गुंतवणार होती. सेमीकंडक्टर निर्मितीचा हा प्रकल्प गुजरात विधानसभा निवडणुकीआधी गुजरातला करणार असल्याचे कंपनीच्या अध्यक्षांनी घोषित केले. यामुळे एक लाखाहून अधिक आयटी मधील रोजगार महाराष्ट्राबाहेर गेले. याप्रमाणेच ‘टेस्ला’ ही मोटार वाहन कंपनीने भारतात आपले कार्यालय पुण्यात उघडले होते. मात्र आता हा प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत करण्यात आला आहे. टाटा एअरबस या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूरच्या मिहानमध्ये २२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार होती, मात्र हा प्रकल्पही गुजरातमधील बडोदामध्ये नेण्यात आला. औषध निर्मिती करण्यासाठी कंपन्या महाराष्ट्रात याव्यात म्हणून राज्यसरकारकडून रायगड मध्ये ‘बल्क ड्रग पार्क’ करण्यात येणार होता यासाठी जागा प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला १ हजार कोटींचे अनुदान मिळणार होते. मात्र आता हा प्रकल्प गुजरात मध्ये करण्यात येणार आहे. 
       नॅशनल मरीन अकॅडमी  आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डस (NSG) हे दोन प्रकल्प मुंबई – पालघर मध्ये होणार होते राज्य सरकारने यासाठी ३०५ एकर जागा अधिग्रहीत केली होती. मात्र सत्तांतर होताच दोन्ही प्रकल्प गुजरातला गेले. मुंबई – वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असणारा हिरे बाजारही मुंबईतून गुजरातला नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. येथे जवळपास २,५०० कार्यालये आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे प्रस्तावित असलेला शिप रेकिंग उद्योग गुजरामधील अलंगला पळवला. मुंबईमध्ये प्रस्तावित असलेले पेटंट आणि ट्रेडमार्कचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले. सिंधुदुर्ग – वेंगुर्ली मधील निवती रॉक येथे प्रस्तावित असणारा आशिया खंडातील पहिला पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरीत करण्यात आला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा असणारा ऑईल रिफायनरी प्रकल्प केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात प्रस्तावित होता मात्र आता त्याचे तुकडे तुकडे करून त्याला महाराष्ट्राबाहेर नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याप्रमाणेच वैद्यकीय उपकरणे पार्क, सौर उर्जा उपकरणे पार्क, रेल्वेचे आणि संरक्षण खात्याचे राज्यातील प्रस्तावित प्रकल्प, दीपक  फर्टिलायझर, दीपक नायर्टेट, गॅलेक्सी केलॉग्स, नूर फुड्स, व्ही.व्ही.एफ, उल्का सी फुड्स हे सर्व उद्योग ही मुंबई बाहेर स्थलांतरित झाले आहेत. 
      हे सर्व प्रकल्प महराष्ट्राबाहेर गेल्यानंतर राज्यात ज्यावेळी याविरोधात आवाज उठवला जाऊ लागला त्यावेळी मोदी आणि भाजपाने या पेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत असे कोणतेही प्रकल्प महराष्ट्रात आले नाहीत. भाजपच्या या धोरणामुळे राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. महायुतीतील घटक पक्ष ही सत्तेसाठी लाचार असल्यामुळे यावर काही भाष्य करत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन महाराष्ट्र अधोगतीला चालला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता महायुतीला नक्की धडा शिकवेल असा विश्वास माने यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!